देशात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असतांना शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची पर्वा न करता सार्वजनिक सफाईची सेवा दैनंदिन सुरु ठेऊन मनपाचे सफाई कर्मचारी अविरत कार्य करीत आहेत. कार्य करतांना गरजूंची गरज लक्षात घेता मनपा झोन क्रमांक २ च्या सफाई कर्मचारी, कामगारांनी अतिशय गरजु, निराधार, अंध, अपंग कुटूंबांना मदत करण्याचा विचार केला. सर्व कामगारांनी एकमताने व आनंदाने होकार देऊन स्वेच्छेनं पैसे गोळा करून १२ जीवनावश्यक किराणा वस्तूंची एक कीट याप्रमाणे ५० किट तयार केल्या आहेत व गरजूंना त्या किट वाटप करण्याचे काम सुरु केलेले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेचे मा. महापौर सो. राखीताई संजय कंचर्लावार, मा. सभापती स्थाई समिती श्री. राहुल पावडे व मा. आयुक्त श्री. राजेश मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली श्री. धनंजय सरनाईक सहा. आयुक्त प्रभाग क्रं.२ व श्री. नरेंद्र बोबाटे, प्रभाग अधिकारी प्रभाग क्रं.२ यांचे सहकार्याने मनपा झोन क्रं.२ (ब) सफाई विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. विवेक पोतनुरवार याकरीता प्रत्यक्ष कार्य करीत आहेत.
मनपा सफाई कामगारांच्या या उपक्रमाचे सामाजीक स्तरातुन स्वागत होत असून महाराष्ट्रातील महानगपालिकेपैकी केवळ चंद्रपूर महानगरपालिका हा उपक्रम राबवित असल्याचे निष्पन्न होत आहे. समाजात जे व्यक्ति अत्यंत गरीब आहेत आणी त्यांच्या घरी कमाविणारी कोणीही व्यक्ति नाही अश्या गरजु व्यक्तिना जीवनावश्यक वस्तूंची किट सफाई कर्मचाऱ्यांमार्फतच वितरीत करण्यात येत आहेत.