नागपूर:
शनीवारी उशीरा रात्री आलेल्या वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे खंडित झालेला वीज पुरवठा महावितरणच्या वतीने मध्य रात्री सुरळीत करण्यात आला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना वीज ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून महावितरणच्या वतीने तात्काळ पावलं उचलली आणि वीज पुरवठा सुरळीत केला.
अजनी चौकात असलेल्या फोर पोल मनोर्यावर शनिवारी रात्री झाड पडल्याने कारागृहास होणारा वीजपुरवठा खंडित झाला.रात्रीची वेळ असल्याने महावितरणच्या अजनी शाखा कार्यालयातील कर्मचार्यानी उपलब्ध असलेल्या साहित्य घेऊन बिघाड दुरुस्त करण्यास सुरुवात केली.झाडाच्या फांद्या कापण्यासाठी कारागृहातील कर्मचारी मदतीस आले.यामुळे मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास कारागृहाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
अभ्यंकर नगरास वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीवरील पिन इन्सुलेटर खराब झाल्याने तात्काळ बदलून मध्यरात्री १२.३० च्या सुमारास येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
बिनाकी शाखा कार्यालयाच्या हद्दीतील वीनोबा भावे नगर, कांजी हाऊस, मेहंदीबाग या परिसरास वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीवरील जंपर खराब झाला.पण अवघ्या ४० मिनीटात या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.शाखा अभियंता सचिन महाले, जनमित्र सलीम शेख, दिनेश दरोडे यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतली.
वर्धमान नगर उपविभागीतील गुलमोहर फिडरवरील १५०० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा मध्यरात्री १२.४० ला सुरळीत करण्यात आला.पारडी परिसरातील सुमारे ७०० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा मध्यरात्री दीड वाजता सुरू करण्यात आला.येथे जंपर खराब झाला होता. डिप्टी सिग्नल येथे वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीवरील पिन इन्सुलेटर खराब झाल्याने तात्काळ बदलून मध्यरात्री २.४५ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
अवेळी आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.कोरोना विषाणूंमुळे सर्व ठिकाणी बंद असताना घरात असलेल्या वीज ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी महावितरणच्या वतीने घेण्यात येत आहे.असे नागपूर परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले.