चंद्रपूर:
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळत असून, आजपर्यंत सुमारे 60 लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी सहाय्यता निधीसाठी उपलब्ध झाला आहे. जिल्हा सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी सामोरे येऊन योगदान दिले आहे.
आज प्रामुख्याने श्रीमती सुमती वझलवार चंद्रपूर यांच्याकडून रु.25 हजार, जयबुद्ध मजूर सह.संस्था विठ्ठलवाडाच्या वतीने रु.1 हजार, विविध कार्यकारी सह. संस्था टेमुर्डा श्री.मेरू नागरी सह. पतसंस्था, महात्मा फुले विद्यालय कर्मचारी सह. पतसंस्था, मेंडकी तर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्था भद्रावतीच्या वतीने प्रत्येकी रु.11 हजार, स्वामी विवेकानंद नागरी सह. पतसंस्था चंद्रपूर तर्फे रु.10 हजार, आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था,करंजी तर्फे रु.2 हजार, सेवा सह. संस्था सोईट, सेवा सह. संस्था वंधली,विविध कार्यकारी सह. संस्था माढेळी, यशस्वी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था चिमूर, विविध कार्यकारी सह.संस्था कन्यका नागरी सह पतसंस्था ब्रह्मपुरी, व सेवा सहकारी संस्था मालडोंगरीच्या वतीने प्रत्येकी रु.5 हजाराचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला.
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048 असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.