चंद्रपूर/ प्रतिनिधी
पुणे, चेन्नई, मुंबई, तेलंगणा येथे कामासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण कामगार परत येत आहेत. त्यांची तपासणी करून विलगीकरण (quarantine) साठी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी ङाॅ. कुणाल खेमणार यांच्याकङे दूरध्वनीवरून केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली व ब्रह्मपुरी तालुक्यातील निमगाव, निफंद्रा, मेहा, खानाबाद, बोडदा या ग्रामीण भागात सोमवारी अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी भेटी दिल्या. या भागातील मोठ्या प्रमाणावर तरुण पुणे, बेंगलोर, चेन्नई, सुरत, नागपूर येथे कामासाठी स्थलांतरित झालेले होते. ते आता परत येत आहेत. मात्र ग्रामीण भागामध्ये त्यांच्या त्यांच्यावर देखरेखीची कोणतीही सुविधा दिसून आली नाही. काही ठिकाणी हातावर विलगीकरनाचे शिक्के मारले असले तरी हे तरुण गावात सर्वत्र फिरतांना दिसून आलेत. अनेक तरुण गावात परत येण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांच्या विलिगीकरणाची सुविधा नाही. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. शहराकडेच प्रशासनाचे लक्ष दिसून येत आहे. पण त्यापेक्षाही गंभीर परिस्थिती ग्रामीण भागाची होत असल्याने प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्याकङे दूरध्वनीवरून केली. त्यानुसार ग्रामीण भागात उपाययोजना करण्यासाठी पोलिस पाटील, सरपंच यांना सूचित करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.