नागपूर/ प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व निरीक्षक दिलीप पनकुले यांच्या नेतृत्वात केंद्रीय वाहतुक मंत्री ना. नितीन गडकरी यांना नागपूर शहरातील विविध समस्या सोडविण्याबाबतच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर यात झालेली जीवघेणी वाढ रद्द करावी, एअर इंडिया विमान सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, BSNL चे खाजगीकरण रद्द करावे, छत्रपतीनगर चौकातील मेट्रोच्या पोलवर छत्रपती शिवाजी महाराजांचे अॅम्बोसिंग भिंती चित्रे चारही बाजूने लावावे, मृत्युमुखी पडलेल्या सर्पमित्रांना वन विभागातर्फे १० लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाने करावी, नागपूर शहरातील वर्धा रोडवरील FCI गोडाऊन स्थलांतरित करावे व त्या जागी ग्रीन झोन जाहीर करावे, मेट्रो व सिमेंट रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधावे, मनिषनगर व बुटीबोरी उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे, नागपूर - पुणे दुरंतो रेल्वे सेवा दररोज सुरू करावी, नागपूर औद्योगिक क्षेत्रात ऑटोहब व्हावा, खाद्यपदार्थ व बेकरीवर लावलेले GST कर कमी करावे या प्रमुख मागण्यांसह इतर १४ मागण्यांचा त्यात समावेश आहे. शहरातील या समस्यांची तीव्रता लक्षात घेऊन ना. नितीन गडकरी यांनी या समस्यांच्या निराकरणासाठी मी स्वतः पुढाकार घेईन असे ठाम आश्वासन दिले. मधुकर भावसार, तात्यासाहेब मते, देविदास घोडे, यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
शिष्टमंडळात भाईजी मोहोड, विलास पोटफोडे, किशोर देशमुख , प्रल्हाद वरोक र अॅड. सोपानराव शिरसाट, लॅकी कोटगुले आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.