विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आश्वासन
नागपूर/प्रतिनिधी,
राज्यातील ओबीसी समाजाच्या अडचणी मला अवगत आहेत. आरक्षणाची टक्केवारी, स्कॉलरशिप मंजुरीस होणारा विलंब, जनगणनेत ओबीसींच्या कॉलमचा अभाव या आणि अशा अनेक मुद्द्यावर आपण वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न निकाली काढण्याकरिता सहकार्य करु असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांचे नेतृत्वात राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी काल शुक्रवारी विधान भवनातील त्यांचे दालनात भेट घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ओबीसी विभागाचे पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांच्याशी ओबीसी समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न, शासनाच्या योजना, ओबीसी आरक्षणाबाबत केंद्रातील भाजप सरकारची विरोधी भूमिका यावर सविस्तर चर्चा केली. तथा राज्यभर नुकतेच घेण्यात आलेल्या आंदोलनाची माहिती दिली.
तत्पूर्वी ओबीसी प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांची बैठक पक्षाचे मुंबई येथील मुख्यालय असलेल्या टिळक भवन दादर येथे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात केंद्र सरकारचे ओबीसी आरक्षण विरोधी भूमिकेविरुद्ध जिल्हा जिल्ह्यात घेण्यात आलेल्या आंदोलनांचा आढावा घेण्यात आला. येत्या काळात तालुकास्तरावर तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. संघटनात्मक बाबीवर ही यावेळी चर्चा करण्यात आली.
टिळक भवन येथील बैठकीनंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची शिष्टमंडळाने त्यांचे शासकीय निवासस्थानी भेट घेऊन राज्यभरात घेण्यात आलेल्या आंदोलनाचा अहवाल सुपूर्द करण्यात आला. ओबीसी विभागाचे कार्याबद्दल यावेळी ना. थोरात यांनी समाधान व्यक्त करून शासनस्तरावरून ओबीसी समाजाचे उत्थानासाठी, कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
सदर ओबीसी विभागाच्या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे, उपाध्यक्ष राजीव घुटे,सरचिटणीस रविंद्र परटोले, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष उमाकांत धांडे, राहुल पिंगळे, मयूर वांद्रे, दिनेश सासे, शैलेश राऊत यासह राज्यभरातील प्रमुख चाळीस पदाधिकारी उपस्थित होते.