चंद्रपूर :
येथील महाऔष्णीक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांना घेऊन उपोषण सुरू केले होते. सोमवारी (ता. १६) खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांची चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या मागण्या सोडण्याच्या अनुषंगाने पत्र खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठवले.
सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आहे. याची तीव्रता कमी झाल्यानंतर मागण्या सोडविण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन खासदार धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले. त्यानंतर उपोषणकत्र्यांनी आंदोलन मागे घेतले.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील पदभरतीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना पूर्ण संधी व प्राधान्य द्यावे. प्रकल्पग्रस्तांच्या मानधनात वाढ करावी, हक्क सोडण्यासाठी पाच लाख रुपये दिले जाते त्यात वाढ करून वेकोलिच्या धरतीवर कमीतकमी पंधरा लाख रुपये देण्यात यावेत, महाराष्ट्रात ३० टक्के वीजपुरवठा या केंद्राद्वारे होतो.
त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणे प्राधान्य क्रमप्राप्त ठरते, तीन वर्षे ट्रेनिंग पूर्ण केलेल्या प्रकल्पग्रस्तांना सेवेत कायम ठेवावे या प्रमुख मागण्यांना घेऊन प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरू केले होते. सोमवारी खासदार धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यांना सकारात्मक आश्वासन दिले.
सायंकाळी काँग्रेसचे नेते रामू तिवारी यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाची सांगता झाली. यावेळी राजू वासेकर, अख्तर हुसेन सिद्धीकी, कुणाल चाहारे, प्रसन्न शिरवार, रूचित दवे यांची उपस्थिती होती.