पुण्यात शिकणाऱ्या मुलांना चंद्रपूरमध्ये पोहोचण्यासाठी
आवश्यक उपाययोजना करणार :विजय वडेट्टीवार
चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. विदेशात जाऊन आलेल्या नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन घेत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करण्यात यावे. शक्यतो घराबाहेर आवश्यक असेल तरच पडावे. 31 मार्चपर्यंत शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना काटेकोरपणे शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी पाळाव्यात, असे आवाहन राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आज एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाची बैठक त्यांनी चंद्रपूर येथे नियोजन भवनात घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गेहलोत याशिवाय सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीनंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 33 नागरिकांची तपासणी करण्यात आली. कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही, असे स्पष्ट केले. काल रात्री उशिरा चार रुग्ण तपासणी करीता आले होते. त्यांचे तपासणी अहवाल देखील निगेटिव आहे. ते धोक्याबाहेर आहेत.त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महानगरपालिका , नगरपालिका, नगरपंचायत यांच्या हद्दीतील सर्व खाजगी सरकारी शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता उद्यापासून गावातील शाळादेखील 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, याचा देखील पुनरुच्चार पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केला.
विद्यापीठात शिकायला गेलेले कर्नाटकातील गुलबर्गा येथे चंद्रपूर जिल्ह्यातील 17 मुले शिकायला होती या सर्व मुलांची तपासणी करण्यात आली आहे. हे सर्व धोक्याबाहेर असून त्यांना देखील चंद्रपुरात आणण्यात आले आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात चंद्रपूरची मुले शिक्षणासाठी पुण्यामध्ये आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्व ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. हे करीत असताना मोठ्या संख्येने नागरिक आपापल्या गावाकडे परतत आहे. मात्र काही खाजगी बसेस या काळामध्ये प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याचे लक्षात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी या सर्व खासगी ट्रॅव्हल्सला निर्देश देत कोणाकडूनही वाढीव पैसे घेऊ नये असे आदेश आज पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले आहेत. अशा आकस्मिक वैद्यकीय आणीबाणीच्या काळात साथरोग कायदा अस्तित्वात असताना अशाप्रकारे प्रवाशांची लूट करणाऱ्या ट्रॅव्हल एजंट वर कडक कारवाई करा असे निर्देशही त्यांनी आरटीओने दिले आहे. गरज पडल्यास पुणे येथून मुलांना आणण्यासाठी अतिरिक्त बसेस उपलब्ध केल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात 25 तारखेपासून सुरू होणारी महाकाली यात्रा स्थगित करण्यासाठी सर्व भक्तांनी दाखवलेल्या सामंजस्यपूर्ण भूमिकेचे पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी स्वागत केले आहे. मंदिराचे ट्रस्टी, विविध मंडळे यांचे देखील त्यांनी आभार व्यक्त केले आहे. याशिवाय राम नवमी उत्सव देखील कोरोना विषाणू संसर्ग वाढणार नाही अशा पद्धतीने हा सण साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. सर्व धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, लग्नकार्य, घरातील खाजगी कार्यक्रम करताना एकमेकांच्या जीविताची काळजी सर्वोच्च ठरवत निर्णय घ्यावा, असे देखील त्यांनी आवाहन केले आहे.
ताडोबा येथे येणार्या विदेशी पर्यटकांना बाबत काळजीचा सूर व्यक्त करण्यात येत असला तरी सर्व रिसॉर्ट व हॉटेल्स मालकांना थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य करण्यात आले आहे. प्रशासनाने या सर्व येणाऱ्या विदेशी पर्यटकांची नाव नोंदणी करण्याचे स्पष्ट संकेत दिले असून याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याचे निर्देश दिले आहेत.
31 मार्चपर्यंत खबरदारी म्हणून प्रत्येक नागरिकाने सजगपणे या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी एकत्रित येणाऱ्या स्नेहसंमेलन व कार्यक्रमांना तिलांजली द्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.