Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च १४, २०२०

आंबेडकर हाऊस, लंडन येथे डॉ. आंबेडकरांचे स्मारक बनविण्यास ब्रिटन शासनाची परवानगी London Borough of Camden

लंडन येथील आंबेडकर हाऊस या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यास कोणतीच हरकत नाही, असा निकाल या प्रकरणी ब्रिटन शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने नुकताच दिला आहे, अशी माहिती माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

श्री . बडोले यांनी सांगितले की , लंडन येथील १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथील वास्तूमध्ये डॉ. आंबेडकर यांचे स्मारक बनविण्याच्या निर्णयाला तेथील स्थानिक प्रशासन यंत्रणेने आक्षेप घेतला होता आणि स्मारक बनविण्याची विनंती फेटाळली होती. त्या विरुद्ध महाराष्ट्र सरकारने ब्रिटन सरकारकडे तक्रार केली होती.या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ब्रिटन सरकारच्या शहर नियोजन विभागाचे निरीक्षक केरी विल्यम्स यांच्या नेतृत्वाखालील समितीची नियुक्ती करण्यात आली होती.या समितीपुढे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनातर्फे आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडण्यात आली.

आता या वास्तूचे निवासी क्षेत्रातून म्यूझीयम डी १ मध्ये रूपांतर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच या वास्तूमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संरक्षक भिंत , रेलिंग व दिव्यांगांसाठी लिफ्टचे काम करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन येथे शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात लंडन शहरातील येथे वास्तव्यास होते. ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने विकत घेतली आहे. त्यांच्यामार्फतच या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व वास्तूच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तथापि, तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्याबाबत आक्षेप घेतला होता .

तेथील स्थानिक प्रशासन यंत्रणेने (London Borough of Camden) उपस्थित केलेल्या आक्षेपांवर उत्तर देताना असे सांगण्यात आले की ज्यावेळी ही वास्तू विकत घेतली, त्यावेळी ती अत्यंत जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिचे तातडीने नूतनीकरण करणे आवश्यक होते.

या स्मारकामुळे जगभरातील आंबेडकर अनुयायांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या कामी सहकार्य केलेल्या व पाठिंबा दिलेल्या सर्व अधिकारी वर्गाचे व कायदे तज्ज्ञांचे मी आभार मानतो , असे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.