आरोग्य जागरूकता कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोंढाळी नजीक माधवबाग हॉस्पिटलमध्ये राष्ट्र विकास संस्था व ई-जनरेशनच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर व आरोग्यविषयक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन (काल दि.१४ मार्च) करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन राष्ट्र विकास संस्थेचे अध्यक्ष योगेश भोसे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष मनीषा तोतडे, सचिव जानबा देवाते, जिल्हा उपाध्यक्ष उमेश फुलंबरकर, सुशील मेश्राम, ई-जनरेशनच्या संचालिका युगा भोसे, समन्वयक पी.पद्मा, सोनू भालसागर, कविता आमदरे, माधवबागचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत ठाकरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता आरोग्य हीच खरी संपत्ती समजून आरोग्य सांभाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन योगेश भोसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
आरोग्य जागरूकता कार्यक्रमाला नागपूर शहरासह काटोल तालुक्यातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. याप्रसंगी आयोजित नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरात ११० महिला व पुरुषांनी रक्तदाब, मधुमेह, ईसीजी यांसारख्या विविध चाचण्यांव्दारे आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
प्रास्ताविक डॉ.अंजली तिवारी यांनी केले तर सूत्र संचालन व आभार प्रदर्शन डॉ.रितू बांगरे यांनी केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.शशिकांत माहुरे, डॉ.राघवेंद्र सिंग, डॉ.संदीप मोहिते, डॉ.हितेश पंधरे, योगाचार्य निलेश ठाकरे व माधवबागच्या चमूने विशेष परिश्रम घेतले.