जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा
चंद्रपूर, दि. 1 मार्च : जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 28 फेब्रुवारी पासुन सुरु असुन 2 मार्च पर्यंत होणार आहे. दिनांक 29 फेब्रुवारी ला सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी राजुरा योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी चंद्रपूर मनोहर गव्हाळ, उपविभागीय अधिकारी बल्लारपूर संजयकुमार ढवळे, उपविभागीय अधिकारी चिमूर प्रकाश संकपाळ, उपविभागीय अधिकारी मूल महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी वरोरा सुभाष शिंदे, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारा तसेच तहसीलदार,महसूल संघटनेचे पदाधिकारी राजू धांडे, विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा,चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा, गोंडपिंपरी उपविभागांनी नाटिका, एकल नृत्य, सामूहिक नृत्य, एकपात्री प्रयोग, वेशभूषा, वादन, गायन इत्यादी अनेक सांस्कृतिक प्रकार सादर केलेत. यामध्ये जागर स्त्रीशक्तीचा ही नृत्यकला, भारतीय लोकनृत्य,वेशभूषा, नृत्यांच्या मार्फत शेतकऱ्यांची व्यथा तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या नाटकाच्या माध्यमातून सादर करण्यात आली. हे सर्व सांस्कृतिक प्रकार लक्षवेधी ठरले.
या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी यांनी दैनंदिन कामकाजा व्यतिरिक्त आपल्या मध्ये असणाऱ्या कलागुणांना प्रगट करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
या जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.