वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र
बोटॅनिकल गार्डनच्या अडचणी घेतल्या जाणून
चंद्रपूर, दि. 1 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बॉटनिकल गार्डन या तीन मोठ्या प्रकल्पाची आज राज्याचे वनमंत्री ना.संजय राठोड यांनी पाहणी केली. या तीनही प्रकल्पातील सुरू असलेली कामे व दुसऱ्या टप्प्यातील अपूर्ण कामे तसेच त्याबाबत असणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतल्या.
चंद्रपूर येथील आपल्या एक दिवसीय दौऱ्यादरम्यान वनमंत्री ना. संजय राठोड यांनी सर्वप्रथम सकाळी वन अकादमीला भेट दिली. चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचे वन अकादमी मध्ये रूपांतर झाल्यानंतर चंद्रपूर येथे या संस्थेची निर्मिती करण्यात आली. वन अकादमी परिसरात वनवा व आपत्ती निवारण केंद्राची निर्मिती सुद्धा होणार आहे. पुण्याच्या यशदा या प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर विदर्भातील महत्त्वपूर्ण प्रशिक्षण संस्था म्हणून वन अकादमी पुढे येत असून आज वनमंत्र्यांनी या अकादमीच्या कामकाजाबाबतची माहिती घेतली. याठिकाणी वनविभागाशिवाय अन्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन अकादमी ही एक स्वायत्त संस्था आहे. या इमारतीचे कामकाज जवळपास पूर्ण झाले असून या इमारतीच्या मार्फत कोणते प्रशिक्षण व कशा पद्धतीने कार्यवहन चालणार आहे या संदर्भातील माहिती त्यांनी यावेळी घेतली. वन अकादमीच्या प्रशिक्षण व कार्यवहन संदर्भातील अहवाल सादर करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या प्रशिक्षण संस्थेची संपूर्ण माहिती यावेळी या वन अकादमीचे संचालक अशोक खडसे यांनी दिली.
त्यानंतर त्यांनी चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध अभ्यासक्रम सुरू झाले असून या अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बांबू प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी 5 जानेवारी 2017 पासून सुरू झालेल्या या केंद्राच्या वाटचालीचे महत्त्वाचे टप्पे सांगितले. या ठिकाणावरून महिला बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या भाऊ युनिटच्या फलनिष्पत्ती बाबत यावेळी माहिती देण्यात आली. महिला बचत गट विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची त्यांनी यावेळी संवाद साधला. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत जिल्हाभरात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देखील घेतली. यामध्ये अगरबत्ती उद्योग, टुथपिक उद्योग आणि पार्टिकल बोर्ड संदर्भात सुरू असलेल्या व्यवसायाच्या संधी बाबतची माहिती राहुल पाटील यांनी दिली. किती लोकांना या माध्यमातून उद्योग मिळाला, प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा महिला व प्रशिक्षणार्थींनी नंतर प्रत्यक्ष कसा फायदा करून घेतला याबाबतची माहिती जाणून घेतली.
त्यानंतर त्यांनी चंद्रपूर शहराच्या बाहेरील भागात बल्लारपूर रोडवर तयार करण्यात आलेल्या एपीजे अब्दुल कलाम निसर्ग उद्यानाला धावती भेट दिली.
शेवटच्या टप्यात त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विसापूर येथे उभे राहत असलेल्या बॉटनिकल गार्डनची पाहणी केली. राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था लखनऊ यांच्यामार्फत बॉटनिकल गार्डनच्या तांत्रिक कामात मदत होत आहे. फुलांचे निर्जलीकरण तंत्र व त्याबाबतचे प्रशिक्षण केंद्र हे या संस्थेच्या सहभागाचा मुख्य भाग आहे. तसेच सायकॅड हाऊस, हर्बेरियम, बीच संग्रहालय, बोन्साय गार्डन, कॅना गार्डन, बोगनवेलिया गार्डन, याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या रोपवन, निरीक्षण पथ, वॉच टॉवर, पूल, रस्ते, जलाशय आदी कामांची पाहणी केली. या प्रकल्पाची माहिती उपविभागीय वन अधिकारी गजेंद्र हिरे यांनी दिली. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनबल प्रमुख ) श्री. रामबाबु , प्रधान मुख्य वनसंरक्षक ( नियोजन ) श्री. साईप्रकाश, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वासुदेवन, अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, मुख्य वनसंरक्षक श्री रामाराव यांच्यासह वनविभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.