Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०७, २०२०

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्यांचे रुग्णालयातील आंदोलनकर्त्या कामगारांना साकडे



चंद्रपूर - नियमानुसार किमान वेतन व भत्ते,पाच महिन्यांचा थकित पगार इत्यादी मागण्यासांठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कामगारांचे मागील 42 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.सर्व स्तरावर लेखी पाठपुरावा व विविध आंदोलने केल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ एस.एस.मोरे तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाने दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी 27 फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे. रुग्णालयातील कामगारांच्या या आंदोलनाला आज दिनांक 7 मार्च रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले स्वर्गीय गोपाळराव वानखेडे महाविद्यालय नांदगाव पोडे चे प्राचार्य नरेंद्र बोबडे व प्रियदर्शनी महाविद्यालय घुग्घुस च्या प्राचार्या रोटरी क्लबच्या अध्यक्षा सौ.स्मिता ठाकरे यांच्या नेतृत्वात प्राचार्यांच्या शिष्टमंडळाने कामगारांच्या आंदोलनाला भेट दिली.शिष्टमंडळामध्ये चिंतामणी महाविद्यालय विसापूर चे प्राचार्य प्रशांत दंतुलवार,भवानजी भाई हायस्कूल व महाविद्यालय चंद्रपुर चे प्राध्यापक लोहे, नूतन महाविद्यालय चंद्रपुर चे प्राचार्य सुरेश श्रीरामे,प्रभू रामचंद्र महाविद्यालय नांदाफाटा चे प्राचार्य अनिल मुसळे
व थापर हायस्कूल बल्लारपूर चे प्राचार्य घनश्याम राय उपस्थित होते.यावेळी शिष्टमंडळाने कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्या.कामगारांच्या सर्व मागण्या नियमानुसार रास्त असून या मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन सुद्धा या शिष्टमंडळाने दिले.
मात्र संपूर्ण जगात व भारत देशात सुद्धा कोरोना विषाणूचे संक्रमण होत असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यातील व शेजारच्या राज्यातील रुग्ण मोठ्या संख्येने येतात.या सर्व संवेदनशील परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बेमुदत काम बंद आंदोलन स्थगित करावे व अन्य सनदशीर मार्गाने कामगारांच्या मागण्यांसाठी लढा सुरू ठेवावा अशा प्रकारची विनंती करणारे पत्र या शिष्टमंडळाने जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना दिले. कामगारांच्या न्याय मागण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही,अधिष्ठाता डॉ मोरे जिल्हाधिकारी डाॅ. कुणाल खेमनार,सहाय्यक कामगार आयुक्त उ.सु.लोया, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून व पाठपुरावा करूनही कामगार कायद्याचे पालन होत नसल्याने नाईलाजास्तव बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागत आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन व वैद्यकीय शिक्षण विभागाने कामगार कायद्यातील नियमांची अंमलबजावणी करून किमान वेतन देण्याचे तसेच दोषी कंत्राटदारांचे कंत्राट रद्द केल्याचे पत्र दिल्यास तातडीने काम बंद आंदोलन मागे घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी देशमुख यांनी शिष्टमंडळाला दिले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.