जिल्ह्यात 130 कोटी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा
यादीतील नाव असणाऱ्या लाभार्थ्यांनी तात्काळ करावे
आधार प्रमाणीकरण : ज्ञानेश्वर खाडे
चंद्रपूर, दि. 6 मार्च : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 6 मार्च पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या 6 हजार 646 खातेधारकांना लाभ मिळाला आहे. ज्या लाभार्थ्यांचे यादीमध्ये नाव आहे परंतु,आधार प्रमाणीकरण केले नाही अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी केले आहे.
राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 सुरू केली असून या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहे.
आतापर्यंत आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्राप्त खात्यांची संख्या 50 हजार 934 आहे. यातील 36 हजार 61खात्याचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. 14 हजार 873 खाते धारकांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण केले नाही.
लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी मूळ आधार कार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर या महत्वाच्या कागदपत्रासह आपले आधार सेवा केंद्रामध्ये जावून प्रमाणीकरण करून घ्यावे.
या व्यक्तींना योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही :
महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, आजी/माजी
विधानसभा विधान परिषद सदस्य,केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रूपये 25 हजारपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून),राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा.महावितरण एसटी महामंडळ इ. ) व अनुदानित संस्था याचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणारे), शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त आहे(माजी सैनिक वगळून),कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ) या व्यक्तींना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.