जागतिक कीर्तिचे फोटोजर्नालिस्ट पद्मश्री सुधारक ओलवे हे मागील ३० वर्षांहून अधिक काळापासून समाजातील वंचित, बहिष्कृत, तळागाळातील घटकांचे प्रश्न आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून प्रभाविपणे जगासमोर आणले आहेत. समाजमनाला हेलावून टाकणारी अशी अनेक छायाचित्रे सुधारक ओलवे यांच्या नावावर आहे.
या सर्व फोटोंचे प्रदर्शन चंद्रपुरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाच्या भारतरत्न लता मंगेशकर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते होणार आहे.
फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट, सेक्युलर आर्ट मुव्हमेंट आणि चंद्रपूर जिल्हा पावर सिटी फोटोग्राफी क्लबच्या संयुक्त विद्यामाने पद्मश्री सुधारक ओलवे यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील फोटोग्राफर, सिनेमा, लघुपट आणि डाक्युमेंट्री निर्मात्यांसाठी ही पर्वणी समजली जाते. छायाचित्र प्रदर्शनादरम्यान संवाद सत्रसुद्धा ठेवण्यात आले आहे. छायाचित्र प्रदर्शन आणि संवाद सत्र सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य राहणार आहे.
पद्मश्री सुधारक ओलवे हे जागतिक कीर्तिचे फोटोग्राफर आहे. विशेषत: ते त्यांच्या सामाजिक फोटोग्राफीसाठी ओळखले जातात. गेल्या ३० वर्षांत त्यांनी अनेक सिनेकलाकारांचे विविधांगी फोटो काढले. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती, गटारात काम करणाऱ्या लोकांचे फोटो काढले त्यासाठी. या फोटोमुळे त्यांना जगभर ओळख प्राप्त झाली. जर्मनीच्या एका शाळेमध्ये नेहमीसाठी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन लागले आहे.
कामठीपुरा भागातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनाचे चित्रण त्यांनी केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील दोन मोठ्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी फोटो एडीटर म्हणूनही काम केले. फोटोग्राफीतील सामाजिक कार्यासाठी त्यांना २०१६ मध्ये पद्मश्री हा देशातील नागरी सन्मान मिळाला आहे. या प्रदर्शनीत सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचे संवाद सत्रसुद्धा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर्सनी या फोटोप्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पावर सिटी फोटोग्राफी क्लबचे गोलू बारहाते आणि देवानंद साखरकर यांनी केले आहे.