चंद्रपूर/ललित लांजेवार:
राज्यभरात होळीनंतर धुळवडीचा उत्साह सुरु असतांना चंद्रपुरात मात्र धुळवडी गालबोट लागले. रंगपंचमीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात ३ विविध ठिकाणी ३ जणांचा मृत्यू झाला.
पहिल्या घटनेत गोंडपीपरी तालुक्यात मुरुमाच्या खड्ड्यात बुडून 11 वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला. नांदगाव फुर्डी गावातील संस्कार मोगरे रंग खेळल्यावर आंघोळीसाठी आपल्या मित्रांसह गावाशेजारील खड्ड्यावर गेला होता. मात्र, खड्डा खोल असल्याचा अंदाज त्याला आल नाही आणि याच खड्यात त्याचा बुडून मृत्यू झाला.गावातून रस्ता बांधकाम सुरू आहे. त्याकरिता लागणाऱ्या मुरुमाकरिता कंत्राटदारांने पोकलेन वापरून भला मोठा खड्डा खोदला आहे. त्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने पाणी साचलं होतं. खड्डा पाण्याने तुडुंब भरलेला होता. ५ मित्र आंघोळीसाठी त्या खड्ड्याच्या दिशेने निघाले. त्याचा ठिकाणी रस्ता कंत्राटदारांची पोकलेन उभी होती. तिच्यावर त्यांनी खेळ खेळत पाण्यात उडी मारली. इतर सर्वच पाण्याबाहेर आले. मात्र, संस्कार बाहेर आलाच नाही.मित्रांनी खूप आरडाओरडा केला मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.
दुसऱ्या घटनेत रंगोत्सवाचा गुलाल खेळून नदीवर आंघोळीला गेलेल्या अखिल कामीडवार(वय 27)याचा बुडून मृत्यू झाला.अखिल हा पोंभूर्णा तालुक्यातील कवठी येथील रहिवासी आहे. रंगपंचमी साजरी करून मित्रांसह अंधारी नदीपात्रात आंघोळीला गेला होता. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.
तिसऱ्या घटनेत वरोरा शहरातील अंकित पिंपळशेंडे हा सरदार पटेल वॉर्डातील युवक वर्धा नदीत बुडाला. 4-5 मित्रांसह मारडा येथे वर्धा नदीवररंग खेळण्यासाठी व आंघोळीसाठी गेला होता. दरम्यान आंघोळीकरिता नदी पात्रात सर्व उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने अंकितचा देखील त्यात मृत्यू झाला. या घटनेने तिन्ही गावात सर्वत्र शोककळा पसरली असून सणाच्या दिवशी झालेल्या घटनेने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.