चंद्रपूर/ललित लांजेवार:
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, पंतप्रधान मोदी यांनी रविवारी जनतेच्या भल्यासाठी जनता कर्फ्यु लावावे लागले, मात्र चंद्रपुरात अधिकारी वर्गाला याचे गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे, धक्कादायक म्हणजे जनता कर्फ्युच्या दिवशी चंद्रपूर शहरात पुण्यावरून सकाळ पासून ८ ते ९ खाजगी ट्रॅव्हल्स दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.या ट्रॅव्हल्समध्ये जवळपास २५० ते ३०० प्रवाशी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी गेले असल्याचे समजते आहे.
विशेष म्हणजे या ट्रॅव्हल्स मधील प्रवाश्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के नसल्याचे आढळून आले. व त्या ठिकाणी बस किव्हा प्रवाश्यांना कोणतेही निर्जंतुकीकरण केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासन किती जबाबदारीने काम करत आहे, याचा उत्तम नमुना जनतेला बघायला मिळाला. ह्या खाजगी ट्रॅव्हल्स चंद्रपुरात प्रवाश्यांना सोडल्यानंतर पडोली येथे परत गेल्या असल्याचे समजते.
याच प्रकरणात शहरातील जनता कॉलेज परिसरात पोलिसांनी एका महिलेला अडविण्याचा प्रयत्न केला व त्यांना दवाखान्यात जाऊन चेक करायसाठी सांगण्यात आले. मात्र ते थेट पुण्यावरुण आलेले प्रवासी आप आपल्या घरी निघून गेले.
यांना कोणी बघण्यासाठी त्या ठिकाणी शासनातील अधिकारी कर्मचारी नसल्याने पुणे वरून आलेल्या प्रवाश्यांमुळे आता चंद्रपूरकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकरणी शहरातील सुजान नागरिक राजेश नायडू यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमनार व पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे आता चंद्रपूरकरांचा जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे चित्र सध्या शहरात दिसू लागले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून बाहेरुन आलेल्या व्यक्तींच्या हातावर स्टॅम्प मारुन त्यांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला जात आहे. इतर लोकांच्या संपर्कात न येण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. तरीही काही लोकं प्रशासनाचा हा आदेश धुडाकवत प्रवास करत आहेत.करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत असतांना अश्या प्रकारच्या दुर्लक्षित पणामुळे एकमेकांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे. या निष्काळजीपणामुळे आता संताप व्यक्त केला जात आहे.
शनिवारी पुण्यावरून विशेष रेल्वेने आलेल्या 1085 प्रवाशांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. पुण्यावरून आलेल्या सर्व नागरिकांनी पुढील 14 दिवस घरातच राहावे, असे स्पष्ट निर्देश त्यांना देण्यात आले असून या सर्व नागरिकांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचे स्टॅम्प मारण्यात आले आहे.यात चंद्रपूर 765 तर बल्लारपूरमध्ये 320 पुण्याचे प्रवाशी आले होते
रेल्वेने आलेल्या प्रवासी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर अशा प्रवाशांची सविस्तर माहिती नोंदविण्यासाठी प्रवाशांना नोंदणी कक्षामध्ये नेण्यात आले नंतर त्यांची थर्मल स्क्रीनिंग करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला नंतरच त्यांना रेल्वे स्थानकांवरून घरी पाठविण्यात आले.यासाठी रेल्वे स्थानकावर एकूण 10 नोंदणी कक्ष,5 थर्मल स्क्रीनिंग कक्ष व 1 होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यासाठी कक्ष उभारण्यात आले होते. यावेळी 765 इतक्या प्रवाशांची या कक्षामध्ये नोंदणी व्यतिरिक्त कोरोना प्रतिबंध उपाययोजना विषयी मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.मात्र रविवारी खाजगी ट्रॅव्हल्स दाखल झाल्याने प्रवाश्याना वाऱ्यावर सोडल्याने यंत्रणेवर ताशेरे ओढल्या जात आहे.
तर चंद्रपूरमध्ये विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपली माहिती स्वतःहून देणे आवश्यक असणार आहे. माहिती लपविल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर सीआरपीसीच्या 188 व आयपीसीच्या 269 ,270 कलमान्वये कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. चंद्रपूर शहरांमध्ये जिल्हा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर प्रशासन लक्ष ठेवत असून आज हे नागरिक रस्त्यावर दिसल्यास पोलिसांची मदत घेण्यात येईल, असे सक्त निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले होते मात्र या प्रकरणात प्रशासन संबंधितांवर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे .