Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी २५, २०२०

महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्याच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल

Image result for mseb
कठोर कारवाईसाठी महावितरण आक्रमक
नागपूर/प्रतिनिधी:
एक वर्षांपासून वीज देयकाची थकबाकी न भरल्यामुळे मीटर काढण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ करणाऱ्याच्या विरोधात पारशिवनी पोलिसांनी विविध कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल केला असून कळमना येथील प्रकरणाप्रमाणे याही प्रकरणात महावितरण प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत मारहाण करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.

पारशिवनी येथील रेखचंद हरिचंद बोथरा या वीज ग्राहकाकडे मागील एक वर्षांपासून सुमारे १२ हजार ४९० रुपयाची थकबाकी होती. या ग्राहकाने आपले वीज मीटर चुकिचे रीडिंग दाखवते अशी तक्रार महावितरणकडे केली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत महावितरणने या ग्राहकाच्या मीटरची तपासणीही केले होती. त्यात मीटर योग्य असल्याचे सिद्ध झाले होते. परंतु यामुळे समाधानी न झालेल्या ग्राहकाने महावितरणच्या ग्राहक सल्लागार गौरी चंद्रायण यांच्याकडे दाद मागितली होती.

 त्यांच्या कडील सुनावणीतही महावितरणची बाजू योग्य असल्याचे स्पष्ट करीत ग्राहकाने वीज देयकाची थकबाकी त्वरीत भरावी, असे निर्देश चंद्रायण यांनी दिले होते. मात्र तरीही संबंधित ग्राहकाने थकबाकीचा भरणा केला नव्हता. 
वारंवार पाठपुरावा करूनही बोथरा दाद देत नसल्याने महावितरणने वीज मीटर काढण्याच्या निर्णय घेतला. २४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास महावितरणचे पारशिवनी उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक अभियंता प्रफुल्ल डोंगरे,उपकार्यकारी अभियंता एम.बी.मानमोडे तसेच इतर कर्मचारी दिनेश सिंगवार, सुदेश सोनटक्के, हितेश मोकाशे, जयंत कोटगुळे, पुरुषोत्तम भोयर, राहुल नारनवरे, रमेश सातपुते, श्रीमंती शांती मंगूळकर वीज मीटर काढण्यासाठी गेले होते.

घटनेच्या वेळी वीज ग्राहक रेखचंद हरिचंद बोथरा घरी नव्हते. त्यांचा मुलगा राहुल जैन (बोथरा) घरी होता. त्याने महावितरणचे कर्मचारी घरी आल्याचे बघितल्यावर त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राहुलने सर्व प्रथम हितेश मोकाशे या महावितरण कर्मचाऱ्यास अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच मोकाशे यांच्या जवळील मोबाईलही हिसकवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. 

यावेळी दिनेश सिंगवार यांनाही मारहाण करण्यात आली.घटनेची माहिती महावितरण कर्मचाऱ्यांनी पारशिवनी शाखा अभियंता प्रफुल डोंगरे यांना दिली. पारशिवनी शाखा अभियंता प्रफुल डोंगरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. पारशिवनी ठाण्यात लेखी तक्रार दिल्यावार पोलिसांनी प्रकरणाची दाखल घेत राहुल जैन (बोथरा) विरोधात भादंवि ३५३, ३३२,२९४ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल केला.

आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी महावितरणचे नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी पारशिवनी येथे जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. अशा प्रसंगात महावितरण प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी महावितरणकडून कायदेशीररित्या पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांच्या सोबत उपविधी अधिकारी डॉ. संदीप केणे उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.