भाजपा प्रदेश प्रवक्ते आ. राम कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागून शिवाजी महाराजांच्या घराण्याची बदनामी केली आहे व असंख्य शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आ. राम कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी केली.
मुंबईत घाटकोपर पोलीस ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली. मा. राम कदम यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून त्यांनी बिनशर्त माफी मागून विधान मागे घ्यावे तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा.
संजय राऊत यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी आपले संबंध होते, असे मान्य केले आहे,त्यामुळे त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा. तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्यासह राजकीय नेत्यांचे हाजी मस्तान, करीम लाला, दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेल्या संबंधांविषयी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यास अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल, असेही आ. राम कदम यांनी अन्य एका निवेदनात म्हटले आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई होण्यासाठीचे आंदोलन आज सुरू झाले असून कारवाई होईपर्यंत ते चालूच राहील. राज्याच्या गावागावात असे आंदोलन होईल,असा इशारा आ. राम कदम यांनी दिला.