नगरपालिकेसमोर दिवसभर धरणे आंदोलन
शिरीष उगे
भद्रावती (प्रतिनिधी) :
येथील बौध्द लेणी प्रवेशद्वारालगत लावण्यात आलेल्या म्युरलच्या विरोधात स्थानिक नगरपालिकेपुढे आज (दि.15) ला दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते. अनेकांनी नगरपालिकेच्या या कृत्याचा निषेध केला असुन नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व काही नगरसेवकांविरूध्द रोष व्यक्त केला आहे. आंदोलनात नारे, घोषणा, भाषण करुन दिवसभर पालीका प्रशासनाचा निषेध केला.
शहरातील विंजासन कडे जाणा-या बौध्द लेणी प्रवेशद्वाराजवळ (दि.9) ला नगरपालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे व मावळ्यांचे भगवान शंकराच्या पिंडीवर तलवारीने बोट कापून रक्त सांडवतानाचे म्युरल लावले. या म्युरलवरुन (दि.9) ला काही काळ तणाव निर्माण झाला होता. पालिका पदाधिकारी व काही नागरीकांमधे शाब्दीक चकमक झाली होती. बौध्द लेणी प्रवेशद्वारालगत बौध्द धम्माच्या थोरा-महात्म्यांची प्रतिके व प्रतिमा लावल्या जाव्या, असा हा तात्विक वाद होता. यावेळी पोलीस प्रशासनाने बघ्याची भुमिका घेतली. नगराध्यक्षाच्या बाजूने भुमिका घेवुन विरोध करणा-या नागरीकावर दडपशाही केल्याचा आरोप यावेळी आंदोलनातून केल्या गेला.
भद्रावती हे एक प्राचीन व ऐतीहासीक शहर आहे. या शहरात त्री-धर्मीय संगम आहे. हिंदू, बौध्द व जैन धर्माचा संगम असलेले व या तीनही धर्माचे पुरातन अवशेष असलेले हे शहर आजही आपली ओळख ठेवून आहे. या त्री-धर्मीय संगमाला प्रवेशद्वारांच्या माध्यमातून ओळख देण्यासाठी भद्रावती नगरपालिकेचे कार्य सुरु आहे. त्यासाठी पालीकेने शहराच्या ज्या बाजूला ज्या धर्माची प्राचीन श्रध्दास्थान आहेत, त्या-त्या भागात, त्या-त्या धर्माचे प्रतिक वापरुन प्रवेश-द्वार तयार केलेले आहेत. सोबतच प्रवेश द्वाराच्या बाजूला त्या-त्या धर्माच्या थोर-महात्म्यांची प्रतिके तथा प्रतिमा म्युरल स्वरुपात लावून सुशोभीकरण करण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी गवराळा येथील हिंदू धर्मीय प्रवेशद्वारालगत हिंदू धर्माच्या देवतांचे म्युरल लावले आहे.
मात्र (दि.9) जानेवारीला विन्जासन बौध्द लेणीकडे जाणा-या प्रवेश-द्वारा शेजारी बौध्द धम्मीय थोरा-महात्म्यांची प्रतिमा व प्रतिके म्युरल च्या माध्यमातून न लावता, एका समाजाच्या पोटजातीचा मेळावा औचित्य समोर ठेवून इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांची मावळ्यासोबतची व शंकराची पिंड असलेली म्युरल लावण्यात आली.
याबाबत बौध्द धम्मीयांनी, छत्रपती शिवाजी या थोर समतावादी महाराजास किंवा त्यांच्या म्युरलला आमचा विरोध नाही. मात्र हेतूपुरस्सर बौध्द धम्मीय प्रवेशद्वारासमोर बौध्द धम्माचे प्रतिक व प्रतिमा न लावता ईतर महापूरुषाच्या प्रतिमा व प्रतिके लावणे, हे बौध्द धर्मीयांच्या श्रध्दास्थाणाला दुखाविण्यासारखे आहे, ही भुमीका या धरणे आंदोलनातून घेतली आहे.
शहरात हिंदू धर्मीय प्रवेश द्वार, स्व.बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार, श्रीराम नगर प्रवेश द्वार व ईतर चांगले ठीकाण असतांना जाणूनबुजुन सामाजिक सौहार्द व एकतेला निव्वळ राजकारणासाठी गालबोट लावून बौध्द लेणी प्रवेश-द्वारावर हे कृत्य केल्या गेले आहे, याचा निषेध असल्याचे यावेळी आंदोलनातून सांगितल्या गेले.
नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, व घटनेत सहभागी नगरसेवकांविरध्द गुन्हे लादुन बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात राजु देवगडे, ॲड. भूपेन्द्र रायपुरे, खुशाल मेश्राम, सुनिल खोब्रागडे, सुशील देवगडे, सिध्दार्थ वाघमारे, हरीष दुर्योधन, मारोतराव रामटेके, विशाल बोरकर, शंकर मुन, उमेश रामटेके, मितवा पाटील, राहूल चौधरी, प्रकाश पेटकर, जितेंद्र डोहणे, राखी रामटेके, खुशाल तेलन्ग, सीमा ढेंगळे, रत्नमाला धोटे, कमलाकर काटकर, सुमध पूनवटकर, मिलिंद राहुलगडे, रामटेके सर, तथा शेकडो नागरीक उपस्थित होते.
--------------------------------------------
या प्रकरणात पोलीसांनी जी दडपशाही केली, त्याचा निषेध आहे. व मी म्हणेल तेच झाले पाहिजे, ही नगराध्यक्षाची शहरात हिटलरशाही सुरु आहे व नगराध्यक्षाच्या भीतीपोटी कुणी बोलत नाही.
- खुशाल मेश्राम, भारीप प्रदेशाध्यक्ष.
--------------------------------------------
कायदयाची पायमल्ली करुन म्युरल लावण्याचे काम झाले आहे. शिवाजी हे समतावादी आहे, मात्र नगराध्यक्ष शिवाजी महाराजांना हिंदूत्व या एव्हढ्याच चष्म्यातून बघतात. खासदार व आमदार यांचा या कृत्यास पाठींबा आहे.
- राजु देवगडे, भीम आर्मी.
--------------------------------------------
सर्वधर्मीयांच्या मतावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीनी समाजविघातक कृत्य करु नये. यापुढे रस्त्यावरच्या लढाई सोबतच न्यायालयीन कायदेशिर लढाई लढू. व आंदोलन मोठ्या स्तरावर घेवुन जावू.
- ॲड. भूपेन्द्र रायपुरे,
बीआरएसपी.
--------------------------------------------