वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक (वणी क्षेत्र) उदय कावळे यांचे आवाहन
चितेगाव (ता. मूल) / प्रतिनिधी
कोलसा, डिझेल, पेट्रोल किती दिवस पुरेल, याचा विचार केला तर पुढे काय, हा प्रश्न पडतो. उर्जेचे माध्यम तात्पुरती गरज पूर्ण करण्यासाठी वापरले जातात. ज्या दिवशी ते संपेल त्या दिवशी नवा पर्याय शोधला पाहिजे. असे ऊर्जा स्रोत शोधा जे अमर्याद असतील, असे आवाहन वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक (वणी क्षेत्र) उदय कावळे यांनी केले.
मूल तालुक्यातील चितेगाव येथील श्रमिक एल्गार कॅम्पसमध्ये आयोजित 26 व्या विदर्भ पर्यावरण परिषदेच्या शेवटच्या दिवशी रविवारी सकाळच्या सत्रात शाश्वत ऊर्जा आणि विकास या विषयावर ते बोलत होते.
यावेळी आयोजक अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी श्री. कावळे यांचे स्वागत केले.
ते म्हणाले, 54 टक्के वीज ही कोल इंडिया च्या भरवशावर मिळते. ही उच्चतम ऊर्जा निर्मिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोलसा खाणी आहेत. त्यातून कोळसा उत्पादनासाठी भूमिगत उत्खनन केले जात आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर हे जमीनदोस्त होईल, ही भिती दाखविली जाते, ती खोटी असल्याचे सांगत श्री. कावळे यांनी वेकोलिच्या प्रगत, तंत्रज्ञानावर लक्ष वेधले. ऊर्जा निर्मिती करताना शाश्वत ऊर्जा, आणि पर्यावरण याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पृथ्वीची निर्मितीच ऊर्जेतून झाली आहे. ऊर्जेशिवाय जीवसृष्टी जगू शकत नाही. म्हणून विकसित राष्ट्र होण्या साठी ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
कोल माईनजवळ विज केंद्र असल्यास खर्चाची बचत होते.
जिथे विज, कोलसा उद्योग जिथे नाही, तिथे प्रदूषण नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.
विकास, प्रगती करायची ऊसेल तर नाण्याच्या दोन्ही बाजू स्विकारण्याची गरज आहे. फायदा आणि परिणाम होणारच, असेही ते म्हणाले.
उर्जा आणि पर्यावरण यावर विचार करण्याची वेळ आली आहे. जसे जसे तंत्रज्ञान पुढे येतील. तसे नवे जग पुढे येइल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनटक्के यांनी केले.