नागपूर ०४ : मेट्रो बांधकाम सुरु असलेल्या मार्गिकेच्या आसपास राहणारे रहिवाशी, विद्यार्थी, व्यापारी ह्यांना मेट्रोबद्दलची संपूर्ण माहिती असावी या हेतूने महा मेट्रोच्या वतीने मेट्रो संवाद आयोजित केले जातात. त्याच अनुषंगाने काल दि. ४ डिसेंबर बुधवार रोजी गद्दीगोदाम स्थित गुरु गोविंद सिंह शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मेट्रो संवादाचे आयोजन केले होते. शहरात निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गिकांवर मेट्रो प्रकल्पाचे कार्य अतिशय वेगाने पूर्ण होत आहे. वर्धा मार्गावरिल रिच-१ मार्गिकेवर मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर हल्लीच जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशनवर देखील सेवा सुरु करण्यात आली, तसेच मेट्रोची गती आणि फेऱ्या सुद्धा वाढविण्यात आल्या त्याचप्रमाणे हिंगणा मेट्रो मार्ग सुद्धा प्रवाश्यांसाठी लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पात रिच-२ या कॉरिडॉरमध्ये सुरु असलेल्या बांधकामांमध्ये द्विस्तरीय आणि चार स्तरीय वाहतूक प्रणालीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. उन्नती मार्ग बनवतांना वापरण्यात येणाऱ्या तांत्रिक पद्धतीचा योग्य बांधणी, प्रकल्पाची वैशिष्ट्ये या विद्यार्थ्यांना दृक-श्राव्य माध्यमाने देण्यात आली. येथील रहदारीला अडथळे निर्माण होऊ नये, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रहदारीच्या नियमांचे पालन किती अत्यावश्यक आहे याबद्दल सांगण्यात आले. गद्दीगोदाम चौक ते आटोमोटिव्ह चौक पर्यत मेट्रो निर्माण कार्यासोबतच डबल डेकर उड्डाणपुलाचे निर्माण कार्य होत असल्याने, कार्य पूर्ण झाल्यास या मार्गावर महत्वाचा बदल नागरिकांना येत्या काळात बघायाला मिळणार आहे तसेच या मार्गावरील गुरुद्वार जवळील भारतीय रेल्वेच्या पुलावर चार मजली वाहतुकीचे स्थळ बघायला मिळणार आहेत. सर्वात खालच्या मजल्यावर रस्ता वाहतूक, पहिल्या मजल्यावर भारतीय रेल्वे, दुसऱ्या मजल्यावर (डबल डेकर) राष्ट्रीय महामार्ग व चौथ्या मजल्यावर नागपूर मेट्रोची वाहुतुक होणार आहे. महा मेट्रो नागपूरच्या सिटीझन कनेक्टिव्हिटी कार्यक्रमाच्या अनुषंगाने मेट्रो अधिकाऱ्यांनी आज या शाळेत उपस्थित होऊन येथील विद्यार्थी व शिक्षकवृदाशी संवाद साधला. नंतर विद्यार्थ्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांचे माझी मेट्रोबद्दलचे मनोगत उत्साहात व्यक्त केले. या रिचचे अतिरिक्त प्रकल्प अधिकारी श्री. माणीक पाटील तसेच,प्रबंधक (सुरक्षा) श्री. संजय पांडे,अरविंद गिरी तसेच महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी श्री अखिलेश हळवे व श्री. सुनील तिवारी या प्रसंगी उपस्थित होते.
या मार्गावर शासकीय कार्यालय,रिजर्व बँक,खाजगी – व शासकीय बँक,औद्योगीक वसाहती,शासकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे रिच-२ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होताना निदर्शनास येते. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर जड वाहणाचे आवागमन देखील मोठ्या प्रमानात होते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो फायदेशीर ठरणारच सध्या याठिकाणी वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे.