महानगर आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांचे अधिकारी व कंत्राटदारांना निर्देश
नागपूर,०४ डिसेंबर: नामप्रविप्रा'चे महानगर आयुक्त तथा नासुप्र सभापती श्रीमती शीतल तेली-उगले यांनी मोठा ताजबाग दर्गा व दर्गाह परिसरात असलेल्या विविध निर्माण कार्याचे तसेच चिचोलीस्थित (नागपूर काटोल मार्ग) शांतीवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तूंचे जतन व संरक्षण/संवर्धन करण्यासाठी संग्रहालयाचे आधुनिकरण व परिसराचे सुशोभीकरण कार्याचे निरीक्षण केले.
प्रसिद्ध मोठा ताजबाग दर्गा आणि दर्गाह परिसरात शासनाच्या नियोजन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य सुरु आहे. या संपूर्ण कार्याचे विशेषतः मुख्य दर्ग्यात लावण्यात येत असलेले मार्बल आणि इनले, सराय ईमारतीचे नुतनिकरण, कॉन्क्रीट रोड ई. कार्याचे निरीक्षण करुन सदर कार्य विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश शीतल तेली-उगले यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले. तसेच प्रशासक, हजरत बाबा ट्रस्ट यांनी केलेल्या विनंतीवरुन अतिरिक्त प्रसाधन गृहाचे बांधकाम करण्याबाबत कारवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. .
चिचोली येथील शांतीवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तूंचे जतन व संरक्षण/संवर्धन करण्यासाठी संग्रहालयाचे आधुनिकरण व परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. याठिकाणी कंपाउंड वॉल, विपश्यना केंद्र, मेमोरियल अँड म्युसियम, मास ट्रेनिंग सेंटर, टिचर्स कॉटेजेस, उपोस्तगार, स्टुडण्ट हॉस्टेल, आनापान सत्ती केंद्र, कॅफेटएरिया आणि डायनिंग हॉल निर्माणाधीन आहे. हे संपूर्ण कार्य देखील विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश शीतल तेली-उगले यांनी अधिकारी व कंत्राटदारांना दिले.
नामप्राविप्रचे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार, नामप्राविप्रच्या अधिक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर आणि सहाय्यक अभियंता श्री. पंकज पाटील तसेच इतर अधिकारी/कर्मचारी व कंत्राटदार यावेळी उपस्थित होते.