येवला विशेष प्रतिनिधि - विजय खैरनार
येवला : तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे पहिल्यांदाच होत असलेल्या ग्रामपंचायत च्या निवडणुकीच्या प्रचार तोफा शुक्रवारी ( दि.6 ) ला संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या आहे.
मानोरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निर्धारित वेळेत सदस्य पदाच्या जागेसाठी केवळ तीन नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्यानंतर उर्वरित सहा जागेसाठी नामनिर्देशन अर्ज न आल्याने तीन सदस्य उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित सहा सदस्य जागेसाठी कोणत्याही पॅनल कडून वेळेत नामनिर्देशन अर्ज न आल्याने सहा जागा रिक्त राहिल्याने या निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला असून या निवडणुकीत कोणताही पॅनल नसल्याने सरपंच पदाच्या तिरंगी लढतीत सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.गावच्या विकासाचा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा विषय ठरला असून तरुण वर्गाने या निवडणुकीत जास्त भर घातला आहे.
दरम्यान येथील सरपंच पदाचा प्रचार हा तीनही उमेदवार आणि कार्यकर्त्याकडून हसून खेळून चालला असून परिसरात या खेळीमय प्रचाराचा आदर्श निर्माण करणारे राजकारण सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. रब्बीच्या पिकांना पाणी भरण्याचे काम सुरू असून उमेदवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मतदारांच्या भेटी घेत असून संपूर्ण गल्ली बोळ्या , शेतकऱ्यांचे बांध , उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी पिंजून काढला आहे. यात प्रामुख्याने नात्यागोत्याचे मतदार जास्त प्रमाणात असल्याने नात्यागोत्याचे मतदार कोणत्या उमेदवाराला आपली पसंती दर्शवणार याची चर्चा जोर धरू लागली आहे. आजची रात्र ही वैर्याची असून गुप्त प्रचाराला जास्त महत्त्व प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे.रविवारी ( दि.8 ) ला मतदान प्रक्रिया पार पडणार असून सोमवारी ( दि.9 ) ला मतमोजणी होणार असल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असल्याचे दिसून येत असून सरपंच निवडीसाठी नंदाराम शेळके , संदीप वावधाने आणि गौरव शेळके यांच्यात तिरंगी लढत होणार असून ही लढत काट्याची होणार असून ग्रामपंचायतीचा किंगमेकर कोण ठरणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.