ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
चंद्रपूर दि. 5 डिसेंबर : ग्रामविकासाचे देखणे उदाहरण एका गावामार्फत निर्माण करण्यासाठी व त्यामार्फत अन्य गावांनी प्रेरणा घेण्यासाठी संसद आदर्श ग्राम योजनेची सुरुवात 16 व्या लोकसभेचे पासून सुरू झाली. यावर्षी देखील सतराव्या लोकसभेसाठी वायगाव तुकुम या गावाची निवड खासदार बाळू भाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. यासंदर्भातील महत्त्वाची बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी घेतली.
सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्रातील भद्रावती तालुक्यात येणाऱ्या वायगाव तुकुम या गावाची निवड करण्यात आली आहे. आज जिल्हा नियोजन भवनामध्ये नियोजन विभागामार्फत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत निलेश काळे, जिल्हा नियोजन अधिकारी ग. रु. वायाळ , भद्रावतीचे संवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, आदींची उपस्थिती होती.
यावेळी संबोधित करताना जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी मार्च 2020 पर्यंत सर्व कार्यक्रमाची अंमलबजावणी या गावांमध्ये होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. पुढील दहा दिवस यासंदर्भात गावांमध्ये जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले गावांमध्ये कोणत्या योजनांची गरज आहे या बाबतचा आराखडा तयार करण्याबाबत ही त्यांनी सूचना केली.
महाराष्ट्र नव्हे तर देशातील उत्तम आदर्श संसद ग्राम म्हणून वायगाव तुकुम या गावाचे नाव लौकिक वाढवावे यासाठी सर्व स्तरातील अधिकारी कर्मचारी यांनी आपला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. आज या बैठकीला भद्रावती तालुक्यातील तालुकास्तरीय तसेच ग्रामस्तरीय सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांच्याशी देखील जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला. ग्रामस्तरावर कशा पद्धतीचा आराखडा तयार करावा यासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षक श्री.संदीप सुखदेवे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.