चंद्रपूर जिल्हा हिवताप व हत्तीरोग नियंत्रण आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 18 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा धडकणार
मूल/ प्रतिनिधी
सुसुत्रता व प्रशासकीय सुधारणेच्या नावाखाली राज्याच्या सार्वजनीक आरोग्य विभागाने राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत कार्यकरणारे हिवताप व हत्तीरोग नियंत्रण विभाग जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्याचे षडयंत्र आखले आहे. राज्य शासनाचे हे धोरण कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत नुकसानदायक असल्याने त्याविरूध्द आवाज बुलंद करण्यासाठी 18 डिसेंबरला राज्यातील सुमारे 12 हजार कर्मचारी नागपूर येथील विधीमंडळाच्या अधिवेशनावर धडकणार असल्याची माहिती हिवताप व हत्तीरोग योजना हस्तांतरण विरोधी समन्वय समितीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष शंकर मेश्राम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी राज्याच्या सार्वजनीक आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांच्या डोळयात धुळफेक करण्याच्या प्रकार केला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट असतांना 22 नोव्हेंबर 2019 ला प्रशासकीय यंत्रणेव्दारे शासन परिपत्रक निर्गमित केले. परिपत्रकाप्रमाणे राज्याच्या सार्वजनीक आरोग्य विभागाअंतर्गत असलेले हिवताप व हत्तीरोग नियंत्रण योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत केले जाणार आहे. असे झाल्यास राष्ट्रीय किटकजन्य कार्यक्रमातंर्गत कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे फार मोठयाप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याचे मेश्राम यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत झाल्यास याविभागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय सेवा विषयक,वेतन व भत्ते विषयक आर्थिक बाबी संबधाने तांत्रीक अडचणी निर्माण होणार असल्याने राज्य शासनाच्या या धोरणा विरूध्द संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील सुमारे 12 हजार कर्मचारी राज्य विधीमंडळाचे नागपूर येथील अधिवेशनावर धडकणार असुन शासनाला जाब विचारणार असल्याचे मेश्राम यांनी म्हटले आहे.