• महत्वाचा ऐवज परत मिळाल्याने महिलेने मानले आभार
*नागपूर 16 :नागपूर मेट्रो मार्गिका असलेला वर्धा रोड तसा सतत वर्दळीचा रस्ता आहे. मेट्रोच्या प्रवासी सेवा या मार्गावर सुरु झाल्या असल्या तरी अजूनही स्थानकांचे बांधकाम सुरु असल्याने, मेट्रोचे कर्मचारी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची, रहदारीची, नागरिकांच्या सुरक्षेची काळजी करत अहोरात्र कामात मग्न असतात. अश्याच एका प्रचंड रहदारीच्या म्हणजेच ऐन ऑफिसला जायच्या गर्दीच्या वेळी सकाळी ११.१५ च्या सुमारास जयप्रकाश नगर मेट्रो स्थानकाच्या पुढे रस्त्यावर एका महिलेची पर्स पडलेली मेट्रोच्या कर्मचाऱ्याच्या नजरेस पडते. पर्सवरून गाड्या जात असतात, पण कुणीही ती उचलून घेण्याची तसदी घेत नाही. हि कुणाची तरी चुकून पडलेली पर्स असावी असा अंदाज बांधत मेट्रो कर्मचारी ती पर्स उचलून आणतो. संपर्कासाठी काही क्ल्यू मिळतो का या उद्देशाने पर्स उघडून तपासतो .. त्यात असतात १३,००० रुपयांची नगद, महागडा मोबाईल फोन आणि अनेक महत्वाच्या कागदपत्रांसह अमूल्य चीजवस्तूही. वास्तविक पाहता कुणालाही मोह सुटावा असेच काहीतरी हाती पडल्याचा अंदाज त्या कर्मचाऱ्याला आला. अहोरात्र कष्ट उपसून कमावलेल्या गोष्टींचे मूल्य, कागदपत्रांचे महत्व जाणून ते ज्याचे असेल त्या व्यक्तीस परत करण्याचा निश्चय मनात करून हा मेट्रो कर्मचारी प्रयत्न करू लागला. पर्समध्ये कुठेही पत्ता सापडला नाही. महत्प्रयासाने लॉक असलेली फोनची संपर्क यादी उघडता आली.. त्यातून त्या महिलेने शेवटी ज्यांना फोन केला त्यांना फोन करून हरवलेली पर्स जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशनवरून घेऊन जावे अन्यथा ती संध्याकाळी पोलिसांच्या स्वाधीन करू तेथूनही नेता येईल असे सांगितले. हा निरोप ज्यांची पर्स होती त्या महिलेपर्यंत पोचता होत नाही तोपर्यंत कर्मचारी संपर्क करीत राहिला. संपर्क झाल्यानंतर आणि पर्स सुरक्षित असल्याचे कळल्यावर भांबावलेल्या महिलेनेही सुटकेचा श्वास घेतला. काही वेळाने या महिलेने जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशनवर येऊन संबंधित कर्मचार्यांशी संपर्क केला.. कर्मचाऱ्याने पर्स परत करत तपासून घ्यायला सांगितले. पर्समधील सगळा ऐवज सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर.. कर्मचाऱ्याचे आभार मनात महिलेने निरोप घेतला.
गेली चार वर्षे शहरभर चालू असणाऱ्या मेट्रो कर्मचाऱ्यांनी शहराचा फक्त चेहेरा मोहराच बदलला नाही तर प्रामाणिकपण, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य, सतत मदतीसाठी तत्पर असणे आणि येथील लोकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचे काम करून अद्वितीय-अमीट असे उदाहरणच कायम केले आहे.