चंद्रपूर/प्रतिनिधी
जिवती तालुका (माणिकगड पहाड) येथे बेचाळीस कोलामगुड्यांवर कोलाम स्थिरावले आहेत. अनेकांना घरकुल आणि शेतीचे पट्टेही मिळाले आहेत. त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा शासकीय अधिकारी प्रयत्न करीत असून, त्यांच्या विकासाचे धोरण राबविले जात असल्याचे चित्र निर्माण केले आहे. पण, वास्तविकता वेगळीच आहे.
रायपूर (ग्रा.पं. खडकी) येथे सोळा कोलाम कुटूंब राहतात. सर्वांनाच शेतजमीनींचे पट्टे आणि सातबारा देण्यात आले आहेत. समस्या ही आहे की, येथिल कोलाम आपल्या शेतात उत्पादन घेऊन आपले गुजरान करीत असताना अचानक काहीजण हातात फाईल घेऊन येथे पोहोचले आणि या जमीनींच्या उत्खननाचा परवाना आपल्याला मिळाला असून, येथे लवकरच खदान सुरु करायची आहे असे येथिल कोलामांना सांगितले. एकीकडे कोलामांना शेतजमीनीचे पट्टे द्यायचे आणि दुसरीकडे बेमालुमपणे उत्खननाचा परवाना द्यायचा असे धोरण यंत्रणेकडून राबविले जात असेल तर कोलामांच्या कोणत्या विकासाचे प्रयत्न शासन प्रशासन करीत आहेत असा प्रश्न उपस्थित होणे क्रमप्राप्त आहे.
येथिल कोलामांपुढे नवा प्रश्न उपस्थित राहीला असून, आता पुढे काय करायचं या भ्रमाने ते ग्रासले आहेत.
ज्या कोलामांना मानवी व्यवहाराशी जुळवून घेण्यासाठी एवढा काळ जाऊ द्यावा लागला. ज्या कोलामांवर आजपर्यंत अनंत अत्याचार केल्या गेले. त्या कोलामांना यंत्रणेकडून अशी पिळवणूकीची वागणूक मिळत असेल तर हा प्रश्न अतीशय गंभीर आहे. या परीसरात आधीच एक लालमातीची खदान सुरु असून यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.आता पुन्हा दुसरी खदान सुरु झाली तर येथिल कोलामांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. समस्यांशी दोन हात करण्याचे तंत्र कोलामांकडे नाहीत. त्यांच्या अद्ण्यानाचा गैरफायदा घेतल्या जात आहे.
या प्रश्नावर लढा उभारण्याचा कोलाम विकास फाऊंडेशन आपल्या छोट्या पावलांनी प्रयत्न करणार आहे. या लढाईला यश आले तर येथील कोलामांना न्याय मिळू शकेल. आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे यश शक्य नाही.
उद्या (दिनांक 16 नोव्हे.) ला रायपूर येथे यासंबंधाने बैठक आयोजित केलेली आहे.
या लढ्याला आपण हातभार लावून लढा यशस्वी करण्यास सहकार्य करावेत, ही विनंती.
वेळोवेळी यासंबंधाने माहीती सदर ग्रुपवर प्रसुत केली जाणार आहेच. आपण त्याला प्रसिध्दी द्यावी एवढीच विनंती. आपल्या सुचनांच स्वागत आहे.
- विकास कुंभारे.
अध्यक्ष, कोलाम विकास फाऊंडेशन.