कोरपना/प्रतिनिधी:-
कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबीच्या वतीने २६ नोव्हेंबरला झालेल्या ग्रामसभेत अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
ज्यांच्या घरी मयत होईल त्यांच्या कुटुंबाला अंत्यविधीसाठी त्वरित तीन हजार रुपये मिळणार असून ग्रामपंचायतच्या वतीने सुरू असलेल्या शुद्ध व थंड पाण्याच्या एटीएम मधून मोफत थंड व शुद्ध पाणी सुद्धा देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू अचानक येतो. अनेक लोकांकडे अचानक आलेल्या मृत्यूमुळे अंत्यविधीकरिता खर्चासाठी पैसे राहत नाही. अशावेळी घरी दुःखाचं वातावरण असताना इतरांना पैशाची मदत मागून अंत्यविधी पूर्ण करण्याची वेळ अनेक कुटुंबांवर येतात. अशावेळी अल्पशी मदत सुद्धा त्या कुटुंबासाठी मोलाची ठरते. त्यामुळे ग्रामपंचायत बिबीच्या वतीने गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बिबी, धामणगाव, नैतामगुडा, आसन (बु.) व गेडामगुडा या पाचही गावातील कुटुंबांना या योजनेंतर्गत मदत देण्यात येणार असल्याचे उपसरपंच आशिष देरकर यांनी सांगितले.