चंद्रपूर १७ सप्टेंबर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत " स्वच्छ चंद्रपूर / बेटर चांदा इंटर्नशिप अभियान " सुरु करण्यात येत आहे, या अभियानाद्वारे चंद्रपूर शहरातील युवा पिढीला पालिका प्रशासनासोबत संवाद साधण्याची तसेच स्वच्छतेसंबंधी त्यांचे विचार, नवीन कल्पना, संकल्पना प्रत्यक्ष राबविण्याची संधी मिळणार आहे.
या अभियानांतर्गत महानगरपालिकेसोबत काम करण्यासाठी ३० युवा इंटर्न्सची निवड २ महिन्यांच्या कालावधीकरीता करण्यात येणार आहे. २० ते २६ वयोगटातील तरुण तरुणींना यात सहभागी होता येणार आहे. निवड झालेल्या इंटर्न्सना चंद्रपुर महानगरपालिका प्रशासनासोबत काम करण्याचा, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया, स्वच्छ भारत अभियान समजण्याचा व प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. इंटर्नशिप अभियान संपल्यावर सहभागी इंटर्न्सना इंटर्नशिप कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार आहे. अभियानात सहभागी होण्यासाठी २२ सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. याकरीता इच्छुक तरुण तरुणीं आपले तपशील Betterchanda@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवू शकतात.
सर्व स्वयंसेवक युवकांना जोडण्यासाठी स्वच्छ चंद्रपूर इंटर्नशिप अभियान सुरु करण्यात आले आहे. यात युवा शहर स्वच्छ करुन श्रमदान करण्यास प्रेरित करणार आहेत. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याकरीता, जनजागृती करण्याकरीता विविध मोहीमा जसे जागरूकता मोहिम, पथनाट्य, घर-घर-बैठक, शहरी आणि शाळा स्तरावरील रॅली, भिंत चित्रकला, स्वच्छतागृहे, खत निर्मिती स्वच्छता मोहिमेबद्दल स्वच्छता मेळावा यासारख्या उपक्रम या व्यतिरिक्त वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह, पथ स्वच्छ करणे आणि शहरातील वेगवेगळे भाग नागरिकांच्या सहभागाने स्वच्छ करणे इत्यादी अनेक कार्यक्रमाचा समावेश असणार आहे. आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात पालकमंत्री इंटर्न पूजा द्विवेदी या अभियानाचे नियोजन आणि अमलबजावणी करणार आहेत शहरातील युवांनी मोठ्या संख्येने यात सभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे
आयुक्त श्री. संजय काकडे - एखाद्या देशाला, राज्याला वा शहराला विकसित व्हायचे असेल तर तेथील युवापिढीचा सक्रिय सहभाग फार महत्वाचा असतो. युवापिढीचे विचार, दृष्टीकोण, ऊर्जा यांची साथ मिळाली तर जनजागृती होण्यास मदत मिळते. चंद्रपूर शहरातील युवा पिढीने स्वच्छ चंद्रपूर इंटर्नशिप अभियानात सहभागी होऊन स्वच्छतेच्या सेवा कार्यात आपले शहर कचरामुक्त व स्वच्छ होण्याच्या दृष्टीने हातभार लावावा.