पवनी : महाराष्ट्र राज्यातील वनक्षेत्रात वाघांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत असलेल्या वाघांच्या संख्येचा विचार केला तर त्यांना भटकंती लागणारा क्षेत्र कमी पडत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे वनातील वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पर्यायाने वाघांचा अधिवास कमी होत आहे. व्याघ्र अधिवास वाढविणे काळाची गरज आहे अन्यथा वाघ लोकवस्ती कडे धाव घेतील असे प्रतिपादन वन्यजीव अभ्यासक प्रशांत रायपुरकर यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय धानोरी येथे फ्लायकॅचर्स वाईल्ड फ्रेंड्स तर्फे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक पारधी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात फ्लायकॅचर्स वाईल्ड फ्रेंड्स चे पंकज देशमुख, प्रशांत रायपुरकर, डॉ. प्रणय लेपसे, प्रतिक लेपसे, अमित पारधी, रुपेश कोरेकर, आदित्य उमाटे, तुषार जावळे, सहाय्यक शिक्षक हरिश्चंद्र भाजीपाले, राजकुमार नागपूरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी पंकज देशमुख यांनी शेतकरी शेतातील पीकाचे संरक्षणासाठी कुंपणावर विद्यूत प्रवाहाचे वापर करीत असल्याने वन्यजीवांचे बळी जातात त्यामुळे ते टाळले पाहिजे असे मत व्यक्त केले. डॉ. प्रतिक लेपसे यांनी शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद घेता येत असल्याने ते अधिक निसर्ग प्रेमी असल्याची भावना व्यक्त केली. प्रतिक लेपसे यांनी वृक्षलागवड करण्यासाठी शाळेत सीड बँक निर्माण करावी, विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे बियाणे परिसरातून गोळा करून शाळेत जमा करावे. त्याचा उपयोग जैवविविधता जपणारी नर्सरी उभारणी करण्याचा संकल्प व्यक्त केला. मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी वनसंवर्धन, जलसंवर्धन व व्याघ्र संवर्धनासाठी चळवळ उभी करण्याची गरज असल्याचे मत अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले . यावेळी फ्लायकॅचर्स च्या वतीने व्याघ्र संवर्धन जनजागृतीसाठी तयार केलेले पोस्टर्स विद्यार्थ्यांना वितरीत केले. संचालन व आभार रविंद्र मोहरकर यांनी केले. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सहभाग होता.