मायणी : ता.खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे)
आजपासून श्रावण हा पवित्र महिन्यास सुरुवात झाली.या महिन्यात महादेवाची उपासना करण्यात येत असते.कालच्या आषाढी अमावस्येदिवशी श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मायणी येथील मांगल्याचं प्रतिक असलेल्या दिव्याची पूजा करून दीप अमावस्या साजरी केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात दीप अमावस्या साजरी केली गेली.या प्रमाणेच मायणी येथील हेमाडपंथीय महादेव मंदिरात राज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने संपूर्ण मंदिरगाभारा व मंडपात दिव्यांची आरास करत मंदिर परिसर उजळून टाकला.
मायणी येथील महादेव मंदिर म्हणजे ऐतिहासिक पुरातन वास्तूचा एक उत्तम नमुना म्हणावा लागेल .या मंदिरात राज संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे उपाध्यक्ष सतीश डोंगरे यांचेसह त्यांच्या संस्थेच्या सदस्यांनी दीप अमावास्येला मंदिरात दिव्याची आरास केल्याने मंदिर अंधारात दिव्यांनी दिपून गेले होते.यावेळी बाबा महाराज यांचे उपस्थितीत उमेश पुस्तके राजाराम कचरे,सतीश डोंगरे,अंकुश ढवळे यांनी महादेवास अभिषेक घातला.
भारतीय संस्कृतीत अंधार दूर करुन प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या दिव्याला अत्यंत महत्त्व आहे. संध्याकाळी देवासमोर, तुळशीसमोर दिवा लावून घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करणे, हा आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेला संस्कार आहे. आजही आपण सायंकाळी देवासमोर दिवा लावून देवाला नमस्कार करतो. पूर्वी वीज नसल्याने अंधार दूर करण्यासाठी देवासमोर, तुळशीसमोर लावलेला दिवा महत्त्वाचा होता. मात्र आता विजेच्या दिव्यांचा झगमगाट असताना हेच दिवे मनातील अंधार, नैराश्य दूर करून सुखद आणि पवित्र वातावरणाची निर्मिती करतात. या प्रमाणेचच "राज" संस्थेने परंपरागत भारतीय संस्कृती चे जतन करीत समाजीकतेचे भान राखले आहे.
यावेळी नितीन पडळकर, सुरज खांडेकर, किरण खांडेकर,संतोष ढवळे,पप्पू जावीर आदी संस्थेचे सदस्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.