- कुंभार समाजाच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी शक्तीनिशी प्रयत्न करेन : ना. सुधीर मुनगंटीवार
- संत गोरोबा माती कला बोर्डाकरिता निधीची कमतरता नाही
- कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
चंद्रपूर, दि. 13 जुलै: महाराष्ट्रातील कुंभार समाज म्हणजे नवनिर्माण करणारा समाज असून वर्षानुवर्ष संत गोरोबाकाकांच्या नावे माती कला बोर्डाची प्रलंबित असणारी मागणी पूर्ण केली आहे. या बोर्डाला निधीची कमतरता भासू देणार नाही. समाजाच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी नेहमी प्रयत्नरत राहील. असे आश्वासन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. 13 जुलै रोजी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघातर्फे आयोजित कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने कुंभार समाज बांधवांचे दर्शन घेण्याचा योग आला. कुंभार शब्द ऐकताच नवनिर्मिती करणारा समाज अशी भावना मनामध्ये निर्माण होते. संत गोरोबाकाका यांच्या नवनिर्मितीच्या तत्त्वावर चालणारा हा समाज असून त्याचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गेल्या तीन दशकांपासून संत गोरोबाकाकांच्या नावे माती कला बोर्डाची प्रलंबित असलेली मागणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण केली आहे. या बोर्डाकरिता 10 कोटी एवढ्या निधीची तरतूद केलेली आहे. माती कला बोर्डाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही. जो समाज नेहमी माझ्या सोबत उभा राहिला त्या समाजाचा नेता म्हणून नेहमी काम करेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सोबतच कुंभार समाजासाठी सुशी , दाबगाव येथे दोन सभागृहाच्या बांधकामाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, यशस्वी खेळाडू तसेच इतर प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना कोणत्याही देशाची ओळख धनसंपन्नतेने निर्माण होत नसून गुणसंपन्नतेने होते. समाजातील विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत, परिश्रम घेऊन ज्ञानसंपन्न होऊन समाज निर्माणाचे काम करावे. यश संपादन करून स्वतःच्या नावा सोबतच समाजाचे आणि देशाचा नावलौकिक वाढवावा. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेली असून नामवंत आयआयटी परीक्षेत बल्लारपूरातील विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारलेली आहे. आपल्या जिल्ह्यात गुणवंतांची कमी नसून त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. त्याकरिता जिल्ह्यात मिशन सेवा हा उपक्रम सुरु आहे. त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून चाचणी परीक्षा, विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप तसेच ठीकठिकाणी वाचानालयाची निर्मिती करण्यात येत असून याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करत असताना राज्यातील प्रत्येक घटकांचा विचार करून निधीची तरतूद केलेली आहे. राज्यातील विधवा, निराधार, घटस्फोटिता व परित्यक्ता महिलांना न्याय देण्यासाठी त्यांचे मानधन 600 रुपये पेक्षा वाढवून 1000 रुपये तर दोन अपत्ये असणाऱ्या निराधार महिलांना 1200 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांचा सन्मान वाढवण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी सुभाष तेटवार यांचे आर्थिक सहयोगातून एका महिलेला शिलाई मशीनचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मूल नगरपरिषदेचच्या अध्यक्ष रत्नमालाताई भोयर, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुभाष तेटवार, महासंघाचे अखिल भारतीय समन्वयक चंदनभैय्या प्रजापती, कुंभार युवा आघाडी प्रदेश संघटक अमोल मोहबिया, नागपूर विभागीय कार्याध्यक्ष एकनाथ बुरबांदे, महासंघाचे इतर पदाधिकारी आणि कुंभार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.