नागपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणतर्फे ५ हजार वीज सहायकांच्या पदांसाठी सुरु करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत ओबीसी वर्गावर कुठलाही अन्याय झालेला नाही. एका तांत्रिक त्रुटीमुळे जाहिरातीत एका वर्गाची पदसंख्या दुस-या वर्गाच्या रकान्यात छापल्या गेली. परंतु ही चूक लक्षात येताच ती लगेच सुधारण्यात आलेली आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरणने ९ जुलै रोजी रात्री १०.४० वाजता आपल्या संकेतस्थळावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये चुकीने ओबीसींसाठी ८१ जागा दर्शविण्यात आल्या होत्या. वस्तुत: आरक्षणाप्रमाणे १५०७ पद असायला हवे होते. काही वेळानंतरच ही चूक महावितरणच्या लक्षात आली. दुस-या दिवशी १.३५ वाजता सुधारित (शुद्धीपत्रक) जाहिरात प्रकाशित करण्यात आली. यात ओबीसींच्या १५०७ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असल्याची सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे अन्यायाचा पश्नच येत नाही.
दरम्यान अनेक ओबीसी संघटनांनी या विषयाला मुद्दा बनवला. ओबीसी आरक्षणाला छेडल्याचा आरोप करण्यात आला. परंतु हे सर्व केवळ एका त्रुटीमुळे झाले असून ती सुधारण्यात आली आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर