26 जुलैला होणार मोफत शो
चंद्रपूर/प्रतीनिधी:
२६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव करत ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी केले होते. यंदा या विजयी दिवसाचे २० वर्षे आहे. त्यामुळे या विजयी दिवसाची आठवण म्हणून राज्य सरकारकडून शुक्रवारी २६ जुलै रोजी राज्यातील ४५० चित्रपटगृहांमध्ये ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट मोफत दाखविला जाणार आहे.
२६ जुलै या ‘कारगिल विजय दिना’चं औचित्य साधत राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याप्रती कर्तव्याची भावना आणि अभिमान वृद्धिंगत व्हावा, या करिता राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक कल्याण विभागाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जुलै 2019 रोजी सकाळी 10 वाजता उरी सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्याचे ठरवले आहे. माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यासंबंधाने निर्देश दिले असून चंद्रपूर जिल्ह्यात या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता 24 जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील चित्रपटगृह मालक व महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस आहे. या दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकवला होता. हा दिवस देशभरात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्यभावना आणि अभिमान वाढावा याकरिता माजी सैनिक कल्याण विभागाने 'उरी दि सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचे संबंधित निर्माते, वितरक आणि राज्यातील चित्रपटगृह मालक संघटना यांच्या सोबत बैठक घेतली.
या बैठकीत चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्यास निर्माते व वितरकांनी अनुमती दर्शविली आहे. या सिनेमाचे मोफत प्रक्षेपण करण्यामागचा मुख्य उद्देश 18 ते 25 वयोगटातील युवकांनी या सिनेमाद्वारे प्रेरित व्हावे असा आहे. हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पाडावा याकरिता माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यंत्रणेला निर्देशित केले आहे.
या चित्रपटाच्या शोचे उद्घाटन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचे कल्याण संघटक दिनेशकुमार गोवारे व मिराज सिनेमागृहाचे व्यवस्थापक धीरजभाई सहारे यांच्या उपस्थित होणार आहे. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी तसेच त्यांच्या अवलंबितांनी 26 जुलै 2019 रोजी सकाळी 10 वाजता नागपूर रोड वरील मिराज सिनेमागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मार्फत करण्यात येत आहे.
यासंबंधाने चंद्रपूर जिल्ह्यात या उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी 24 जुलै रोजी जिल्ह्यातील चित्रपटगृह मालक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे सोबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीनंतर थिएटरची नावे जाहीर केली जाणार आहे.