ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
ब्रह्मपुरी, सावली व सिंदेवाही तालुक्यात रस्त्यांची कामे सुरू असली तरी काही रस्त्यांची कामे राहिली होती. ही कामे तातडीने होण्याच्या दृष्टीने रस्ते व पूल परिरक्षण आणि दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देवून वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे तिनही तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, प्रशासकीय मान्यतासुद्धा देण्यात आली आहे. .
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये नागरिकांच्या भेटीदरम्यान अनेक रस्ते झाले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. या संदर्भात नागरिकांनीही मागणी केली होती. त्या अनुषंगाने आमदार विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शिफारस करून वारंवार पाठपुरावा केला. ब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगाव, मालडोंगरी, धामनगाव, वायगाव, सिंदेवाही तालुक्यातील सिंदेवाही, रामाळा, गडबोरी, वासेरा, चिमूर, सिंदेवाही, आरमोरी, सावली तालुक्यातील हिरापूर, बोथली, पाथरी रस्ता, सावली, शिर्सी, हरंबा, व्याहाड बुज. रस्ता व इतर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २५ जुलै रोजी २० कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. या क्षेत्रातील विकसित नसलेल्या भागाचा विकास करण्याचे आपल्यासमोर आव्हान होते. त्यामुळे सर्वांगीण विकास करण्यासाठी पाच वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम आपण तयार केला. त्या दृष्टीने पाठपुरावा केल्यानंतर हे यश प्राप्त झाले असल्याचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. गेल्या साडेचार वर्षात अनेक विकासकामे झालेली आहेत. काही कामे पूर्ण झाली असून, काही निविदा प्रक्रियेत असल्याचेही त्यांनी सांगितले.