चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांचा शासकीय नोकरीमध्ये टक्का वाढावा या दृष्टिकोनातून राबविण्यात येणाऱ्या मिशन सेवा प्रकल्पांतर्गत एमपीएससी परीक्षेची तयारी या विषयावर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, मिशन सेवा व द युनिक अकॅडमी शाखा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सेमिनारचे आयोजन 3 ऑगस्ट 2019 रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
तरी या सेमिनारचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
मिशन सेवा या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम सुरू करण्यात आले असून या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या पुस्तकांच्या संचाचे मोफत वितरण करण्यात आलेले आहेत. तसेच सर्व सोयीसुविधांनी युक्त प्रत्येक तालुक्याला वाचनालयाची उभारणी करणे सुरू आहे. याच माध्यमातून येत्या 3 ऑगस्ट रोजी प्रियदर्शनी सभागृहात एमपीएससी मोफत सेमिनारचे आयोजन केलेले आहे.
या सेमिनारला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व लेखक मनोहर भोळे तसेच दि युनिक अकॅडमी शाखा नागपूरचे केंद्रप्रमुख बापू गायकवाड संबोधित करणार आहेत. तसेच कार्यक्रम स्थळी द युनिक प्रकाशित पुस्तके 50% च्या सवलत दरात उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.