Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै २८, २०१९

नागभीडच्या विकासाकरिता राज्याच्या विशेष कृती आराखड्यात नागभीडचा समावेश करू;मुनगंटीवार

नगरपालिका कार्यालयाचे स्थानांतरण कार्यक्रम
चंद्रपूर/प्रतीनिधी:
Image may contain: 10 people, people smiling, people standing
संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाकरिता आपण कायम कटिबद्ध असून नागभिड तालुक्याचा विकासाच्या विशेष कृती आराखड्यात समावेश करू, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 27 जुलै 2019 रोजी नागभीड येथे आयोजित नगरपरिषद कार्यालयाचे स्थानांतर कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया, नागभिड नगर परिषदेचे अध्यक्ष उमाजी हिरे, बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरिष शर्मा हे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, ज्याप्रमाणे मी पुस्तके वाचतो त्याप्रमाणे लोकांचे चेहरे वाचता येते. लोकांची अपेक्षा नेमक्या काय आहेत ते सहज कळते. त्यामुळे नागभीड वासियांची बस स्टैंडची असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी लवकरच शासनाचा आदेश काढू. तसेच तालुक्याच्या विकासाकरिता राज्याच्या विशेष कृती आराखड्यात नागभीडचा समावेश करू. 

जिल्ह्यातील बेरोजगारी नष्ट करण्याकरिता बचत गटाचे सक्षमीकरण करण्याकरिता 500 कोटीची योजना तयार केलेली आहे. जो दुसऱ्याचा स्वप्न साकार करण्याकरिता काबाडकष्ट करतो अशा बांधकाम कामगारांना मोफत घरे देण्यात येणार आहे. अनुसूचित जमातीच्या घरकुल योजनेतील घरांची संख्या 7 हजार तर आदिवासी घरकुल योजनेतील घरांची संख्या वाढवण्याकरिता आदिवासी मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. 

तसेच ओबीसी बांधव घरकुलापासून वंचित राहू नये, याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री यांच्याशी चर्चा करून राज्यासाठी 19 लक्ष घरे मंजूर केलेली आहे. सोबतच जिल्ह्यातील 80% दिव्यांग असणाऱ्या बांधवांना घरकुल योजना राबवण्यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्याला गॅसयुक्त करून चुलमुक्त व धुरमुक्त करण्याकरिता 100% गॅस कनेक्शन अभियान सुरू केले. तर बीपीएलधारकांना 2 रुपये व 3 रुपये किलो अन्नधान्य मिळत आहे. तसेच एपीएल धारकांनाही त्याच किमतीत अन्नधान्य मिळावे. याकरिता 100% शिधापत्रिका वाटप व 100% अन्नधान्य वाटप मोहीम जिल्ह्यात राबवली जात आहे. जिल्ह्यात सध्या परिवहन महामंडळाच्या जुन्या 250 बसेस कार्यरत आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सहकार्याने जिल्ह्याला 200 नवीन बसेस प्राप्त होणार आहे. त्यापैकी 50 बसेसचे लोकार्पण 29 जुलै रोजी बल्लारपूर येथे होणार आहे. अर्थसंकल्पात विधवा, निराधार, परितक्त्या, घटस्फोटिता महिलांचे 600 रुपयांचे अनुदान 1200 रुपये पर्यंत वाढवलेले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब भूमातेच्या चरणी अर्पण करून जिल्ह्याला पाणीदार बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असून त्याला जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.