नीलमताईंची बिनविरोध निवड ही सभागृहाच्या प्रथा, परंपरेला साजेशी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 : विधानपरिषद उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची झालेली बिनविरोध निवड ही सभागृहाच्या प्रथा, परंपरेला साजेशी आहे. नीलमताईंचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक असा सर्वच क्षेत्रात नावलौकीक राहिला आहे. आपल्या अनुभव व कार्यकर्तृत्वाच्या बळावर उपसभापतिपदाची उंची वाढविण्याचे काम त्या करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केला.
विधान परिषद उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची आज बिनविरोध निवड झाली. यावेळी अभिनंदनपर प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलत होते. तत्पूर्वी, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा उपसभापतीपदासाठीचा प्रस्ताव हा सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि सदस्य अॅड. अनिल परब यांनी मांडला. यावर उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सदस्य अॅड. भाई गिरकर यांनी अनुमोदन दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस अभिनंदपर प्रस्तावावर बोलताना म्हणाले, नीलमताईंच्या माध्यमातून विधान परिषद इतिहासात एक नवीन पान जोडले गेले आहे. उपसभापतीपदी सुमारे ६० वर्षानंतर एका सक्षम आणि कार्यक्षम महिलेची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती आणि उपसभापतीपदाला एक उच्च परंपरा लाभली आहे. एकमताने निवडीची परंपरा ही यावेळीही कायम राहिल्याबद्दल त्यांनी सभागृहाला धन्यवाद दिले.
नीलमताईंच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रत्येक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास पहायला मिळाला आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी वैद्यकीय सेवेत घालविला आहे. नीलमताईंची सामाजिक प्रश्नांवर आक्रमकता पाहिली असून अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी सभागृह गाजविले आहे. विधानपरिषदेतही त्यांनी विविध समित्यांवर काम केले आहे. त्यात कामकाज सल्लागार समिती,हक्कभंग समितीचा प्रामुख्याने समावेश आहे. सामाजिक प्रश्नांवर काम करताना त्यांनी कुठलाही राजकीय अभिनिवेष ठेवला नाही. भूमिहीन मजुरांच्या हक्कांचा लढा हे त्यांचे वैशिष्टयपूर्ण कार्य राहिले आहे. महिला सक्षमीकरणाचे काम त्यांनी केले आहे. अतिशय संवेदनशील मनाच्या नीलमताई या पदाला एका वेगळ्या उंचीवर नेतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
अभिनंदनपर प्रस्तावावर विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देत पदाला साजेसे काम करीत न्याय देणार असल्याचे सांगत एकमताने निवड केल्याबद्दल सभागृहाचे आभार मानले.