जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घेण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
मुंबई, दि. 22 : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, पाण्याची टाकी, मंत्रालयात बसविलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई काही दिवसांपूर्वीच झाल्याचे सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. असे असूनही कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची तीव्रता पाहता पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, असे सांगतानाच मुख्य सचिवांनी मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना झालेल्या त्रासाबाबतची माहिती घेतली.
पाण्याचे नमुने तपासतानाच मंत्रालयात ठिकठिकाणी आर ओ यंत्र बसविले आहेत त्यांची तपासणी मोहीम लगेचच हाती घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. पाण्याच्या टाकीतून मंत्रालयात ज्या वाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा होतो त्यांची देखील तपासणी करावी, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री. सगणे, मंत्रालयातील बांधकाम आणि विद्युत विभागाचे अभियंता, आरोग्य विभागाचे अधिकारी, मंत्रालयातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.