स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांच्या पाहणीनंतर कामाला गती : २०० टिप्पर माती काढली
नागपूर, ता.२२ : शहराला पाणी पुरवठा करणा-या गोरेवाडा तलावाच्या खोलीकरणाचे कार्य नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आले आहे. भविष्यात शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी खोलीकरणाचे कार्य व्यवस्थित होणे आवश्यक आहे. या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा बाळगला जाऊ नये यासाठी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे सदर कार्याकडे विशेष लक्ष देत आहेत. तलाव खोलीकरणाची वेळोवेळी पाहणी करून त्यांच्यामार्फत कामाचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचेच फलित म्हणून कामाला गती मिळाली असून आतापर्यंत गोरेवाडा तलावातून सुमारे २०० टिप्पर माती काढण्यात आली आहे.
शनिवारी (ता.२२) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंगणे व नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी गोरेवाडा तलावाच्या खोलीकरण कामाची पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त प्रकाश वराडे, मनपा कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू, सर्वश्री मनोज अग्रवाल, हर्षद घाटोळे, भूषण इंगळे, श्रीकांत भूजाडे, प्रमोद भस्मे, सवित वालदे, नरेंद्र त्रिपाठी, मुसा भाई, कामर सिद्दीकी, सुजात सिद्दीकी, श्री. भोतमांगे आदी उपस्थित होते.
गोरेवाडा तलाव खोलीकरण कामाची शुक्रवारीही (ता.२१) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पाहणी करून कामात येणारे अडथळे दूर करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले होते. शनिवारी (ता.२२) पुन्हा नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंगणे व नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांच्या समवेत पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
सद्या तलावाच्या खोलीकरण कार्यामध्ये चार पोकलेन व १० टिप्पर कार्यरत आहेत. लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे यासाठी पोकलेन व टिप्पर वाढवून युध्दपातळीवर काम करा, असे निर्देश यावेळी स्थायी समिती प्रदीप पोहाणे यांनी दिले. तलाव खोलीकरणाचे कार्य युध्दपातळीवर सुरू असून लवकरच संपूर्ण काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.