चंद्रपूर/प्रतिनिधी:
सुरतमधील तक्षशिला कॉम्प्लेक्समध्ये आग लागून १९ विद्यार्थी ठार झाल्याच्या घटनेने खडबडून जागे झालेल्या चंद्रपूर महानगरपालिकेने अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या इमारतींची माहिती गोळा केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. चंद्रपूर शहरातील बहुतेक व्यावसायिक इमारतींमध्ये फायर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, यामध्ये आतापर्यंत अवैध कोचिंग क्लासेससह ९० व्यावसायिकांना महानगरपालिकेने नोटीस बजाबली आहे.
त्यामुळे या शहरातील नागरिक किती असंवेदनशील आहेत, याचे हे उदाहरण ठरलेले आहे. या सर्व इमारतींवर व्यावसायिक कर लावण्यात यावा, अशी मागणी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी लावून धरली. त्यामुळे या सर्व इमारतींची माहिती मागवून त्यांच्यावर व्यावसायिक कर लावला जाणार आहे.अनेक मालमत्ताधारकांनी निवासी
प्रयोजनासाठी बांधकामाची परवानगी घेतली; आणि बांधकाम मात्र व्यावसायिक प्रयोजनासाठी करण्यात आले.
महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने आठवडाभरात ८३ जणांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे व्यावसायिक कर लावण्याची कार्यवाही लवकरच केलीजाणार असून, यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत लाखो रुपयांची भर पडणार आहे.