राज्य परिवहन महामंडळाचा खुलासा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
बल्लारपूर येथील झालेल्या पावसामुळे बल्लारपूर बसस्थानकातील वॉच टावर जवळील सिलिंग छत पावसाच्या धारासोबत खाली कोसळली. मात्र ही दुर्घटना छतावर अतिरिक्त पाणी साठल्यामुळे झाली, असा खुलासा संबंधितांनी केला आहे. तथापी, त्याबाबत वर्तमानपत्रामध्ये बल्लारपूर बसस्थानक येथील बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले. हे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आलेला आहे.
बल्लारपूर बस स्थानकाच्या रुफिंगला प्रोफाईल शीट लावण्यात आलेली आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी रूफिंगला काँक्रीट नाल्या तयार केलेल्या आहेत, त्यामधून पावसाचे पाणी वाहून खाली निघून जाते. परंतु रूफिंगच्या सीटवर झाडाच्या फांद्या गेल्यामुळे त्याचा पालापाचोळा रूफिंगच्या नालीमध्ये गोळा होऊन सदर नाली पूर्णपणे बुजून गेली होती. त्यामुळे वरील काँक्रीट नाल्या पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो होऊन आतील बाजूस पाण्याची धार बसस्थानकाच्या आतील वॉच टावर जवळ छताच्या सिलिंगवर कोसळत होती. सदरचे दृश्य व्हिडिओमध्ये दिसून येते. पाण्याच्या एकत्रित धारेच्या दबावामुळे त्या ठिकाणचे छताचे सिलिंग खाली कोसळले. वास्तुविशारद यांनी अपघात होणार नाही अशा प्रकारच्या सिलिंगची निवड केली आहे.
तरी बसस्थानकाच्या कामासाठी वापरण्यात आलेली प्रत्येक बाब वास्तुविशारद व कार्यकारी अभियंता, राज्य परिवहन नागपूर यांच्याकडून तपासणी करून व निवड करून लावण्यात आलेली आहे. उत्तम दर्जाची आहे. अशी माहिती विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर विभाग कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे.