महावितरणचा वर्धापन दिन उत्सहात साजरा
नागपूर/प्रतिनिधी:
वर्धापन दिनानिमित्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल |
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कठोर मेहनतीमुळेच आज महावितरण कंपनी आशिया खंडातील सर्वात मोठी विदुयत वितरण कंपनी ठरली आहे, असे गौरव उद्गार महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात काढले.
काटोल रोड येथील प्रादेशिक कार्यालयात गुरुवारी महावितरणचा १४ वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना घुगल पुढे म्हणाले की, सन २००५ मध्ये पूर्वीच्या एमएसईबीचे विभाजन होऊन महावितरण कंपनीची स्थापना झाली. कंपनीच्या सुरुवातीच्या काळात महसूल दरमहा १०००-१२०० कोटी रुपये होता. पण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कठोर मेहनत घेत हा आकडा दरमहा ६ हजार कोटीच्या घरात गेला आहे. यासाठी मागील १४ वर्षाच्या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात मजबूत वीज यंत्रणेचे जाळे विणण्यात आले. वीज ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळावा यासाठी अनेक ठिकाणी नवीन उपकेंद्र सुरु करण्यात आली. प्रभावी वीज यंत्रणेमुळे आज राज्यातील अडीच कोटी ग्राहकांना आपण दर्जेदार वीज पुरवठ्यासोबत उत्तम सेवा देत आहे. कंपनीच्या स्थापने नंतर टोल फ्री क्रमांक, महावितरण मोबाईल अँप, वीज देयकाचे पैसे ऑनलाईन भरणे यासारख्या ग्राहकाभिमुख सेवा सुरु करण्यात आल्याचे घुगल यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, (स्थापत्य) राकेश जनबंधू, महाव्यस्थपाक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, नागपूर शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके,उप महाव्यस्थपाक(माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर, राजेंद्र गिरी, प्रमोद धनविजय, सहायक महाव्यस्थपाक (मानव संसाधन) वैभव थोरात उपस्थित होते.