ब्रह्मपुरी (चंद्रपूर):
ब्रह्मपुरी शहरातील पेठवार्ड प्रभाग १० मधील ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गालगत असलेल्या शिवनगर वसाहतीत विजेसंदर्भात त्या भागातील लाइनमनला रविवारी तक्रार प्राप्त झाली. तक्रारीच्या अनुषंगाने लाइनमन सायंकाळी ६ चे दरम्यान घटनास्थळी पोहोचले. प्रॉब्लेम वीजेच्या पोलवरून असल्याचे लक्षात येताच लाइनमन यांनी स्वत: विजेच्या खांबावर न चढता आपला सहकारी बेरोजगार युवक अनिल भय्याजी ढोरे (३५) रा. धुमनखेडा वार्ड ब्रह्मपुरी याला पोलवर चढायला सांगितले. पोलवर चढल्यानंतर झुला लावत असताना अनिल ढोरे याचा हाताचा स्पर्श जिवंत विजेच्या तारांना झाला व विजेच्या जोरदार धक्क्याने अनिल २० ते २५ फुटाच्या पोलवरून खाली असलेल्या सिमेंट काँक्रिटच्या नालीवर पडला. झालेल्या अपघातात अनिल ढोरे या युवकाला डोक्याला व कमरेला गंभीर दुखापत झाली. त्याला जखमी अवस्थेत डॉ. गेडाम यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे वीज वितरणाचे काम करण्याकरिता मोठ्या पगारावर लाइनमनची नियुक्ती केली जाते. वीज वितरण कंपनीकडून पगार लाइनमन घेत असले तरी मात्र काही लाइनमन स्वत: प्रत्यक्ष काम न करता काही बेरोजगार युवकांना आपल्या हाताखाली ठेवून धोकादायक कामे करून घेत आहेत. रविवारी असाच एक युवक दुरुस्तीकरिता लाइनमनच्या उपस्थितीत खांबावर चढला व विजेचा धक्का लागून खाली पडला. यात तो जबर जखमी झाल्याच्या घटनेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
अनेक युवक हे आपण कधीतरी लाइनमन म्हणून विभागामध्ये नोकरीवर लागू, या भोळ्या आशेपायी जोखमीचे काम करत आहेत.
काही ठिकाणावरून विजेसंदर्भात तक्रार या लाइनमानला मिळाली तरी ते स्वत: त्या ठिकाणी जात नाहीत तर त्यांचे हाताखालील बेरोजगार युवक ते काम पूर्ण करताना दिसून येतात. अनेकदा जबाबदार लाइनमन स्वत: तक्रारींच्या ठिकाणावर हजर असले तरी विजेच्या खांबावर चढणे व जिवंत विजेच्या तारांमधून त्यातील त्रुटी काढायचे काम या बेरोजगार युवकांकडूनच करून घेतले जात आहेत. पाेलीस किवा ईलेक्ट्रीकल ईसंपेक्टर ला माहीती न देता प्रकरन जे.ई. कडून दडपन्याचा प्रकार सुरु असल्याचे समजत आहे.