चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील 146 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात चंद्रपूर जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
जून ते सप्टेंबर 2019 या दरम्यानच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर झालेला आहे. सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र 31 मे ते 6 जून 2019 या कालावधीत स्वीकारले जाणार आहे. 2 व 5 जून 2019 या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्राची तपासणी 7 जून 2019 ला होत असून 10 जून 2019 पर्यंत ही वापस घेता येईल, त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल व मतमोजणी 24 जून 2019 रोजी होणार आहे.
या निवडणुकीत राज्यातील 62 ग्रामपंचायतींमधून थेट सरपंच निवडला जाणार असून विविध ग्रामपंचायतीतील 6 हजार 719 सदस्य पदाचा रिक्त जागांचा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील एक सरपंच थेट निवडला जाणार असून रिक्त असलेल्या 103 सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहे.
सदर निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करणे, परत करणे या प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीच्या आहेत. आणि निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणुकीच्या निकालापर्यंत आचारसंहिता लागू राहील, अशी माहिती जिल्हा हा निवडणूक विभागाने दिलेली आहे.