तोतलाडोह धरणातील मृत पाणी साठ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने शासनाकडे पाठवावा
- डॉ. संजीवकुमार
नागपूर, दि. 26 : शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता 25 ते 30 घनमीटर पाणीसाठयाची तूट पडू शकते. पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी तोतलाडोह धरणातील मृत पाणीसाठ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले.
शहराकरिता पिण्याच्या पाण्याचे नियोजनाबाबत बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालीका आयुक्त अभिजित बांगर यासह जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता ज.ग.गवळी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या पाणी वापरानुसार शहराचा पाणी पुरवठा सुरू ठेवल्यास 30 जूनपर्यत 25 ते 30 दलघमी पाण्याची तुट राहील असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगीतले. जून अखेरची पाण्याची तूट भरून काढण्याकरिता तोतलाडोह जलाशयाच्या मृत साठ्यातून पाणी उपलब्ध करून देता येईल याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.
खिंडसी जलाशयात सध्या 9.90 दलघमी पाणी उपलब्ध आहे. या जलाशयातुन रामटेक शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. दरवर्षी उन्हाळ्यात मोहाडी शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता पेंच डावा कालव्यातून सूर नदीत पाणी सोडण्याची मागणी असते. मोहाडी शहराकरीता पाणी पुरवठा करण्यासाठी जलस्त्रोत उपलब्ध आहे का किंवा पर्यायी व्यवस्था तपासून बघण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी केली.
कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राकरिता लागणारा पाणीपुरवठा 30 जूनपर्यंत करण्यात यावा. त्यानंतर आढावा घेवून पुढील निर्णय घेण्यात येईलअसेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.