जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत कामांचा आढावा ;
: जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार
चंद्रपूर, दि. 25 एप्रिल: प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूर मार्फत मंजूर कामांना वितरीत केलेल्या निधीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 25 एप्रिल 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात बैठक पार पडली.
चंद्रपूर जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना राबविण्यात येत असून, जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध विकासकामांना मंजुरी प्रदान करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,चंद्रपूर शहर महानगरपालिका, वनविभाग, कॅन्सर केअर फाउंडेशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग, मृदा व जलसंधारण विभाग अशा विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विविध विभागाच्या मंजूर कामांचा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी बारकाईने आढावा घेतला. हा आढावा घेत असताना ज्या विभागाचे काम अपूर्ण राहिले त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच जी कामे पूर्ण केली आहे. त्याचा सचित्र अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. अपूर्ण कामाबाबत सतत पाठपुरावा करण्याचे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
सोबतच प्रस्ताव प्राप्त काही कामांना निधीसाठी मंजुरी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी कोणत्याही कामासाठी निधीची मागणी करत असताना लोककल्याण हा उद्देश ठेवून त्या कामाची प्राथमिकता व उपयोगिता तपासली जाईल. त्याआधारेच निधीची मंजुरी प्रदान करण्यात येईल. म्हणून अधिकाऱ्यांनी कामाचा आराखडा तयार करत असताना जनकल्याणाचा विचार करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.