करारनाम्याचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश
चंद्रपूर दि 23 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या कथित अवैध उत्खननाच्या संदर्भात प्रशासनाने कडक पाऊले उचलणे सुरू केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे पोंभुर्णा परिसरात तहसिलदारामार्फत सुरू असलेल्या कारवाईची माहिती जारी केली आहे . जिल्ह्यात जीपीएस यंत्रणा वाहनासोबत वापरण्यात येत असून अवैध उत्खनन व वाहतूक नियंत्रण करण्याच्या दृष्टीने अटी व शर्ती करारनाम्यात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे रेती घाट धारक ठेकेदारांनी याचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
अवैध रेती उत्खनन संदर्भात प्रशासनामार्फत मोठया प्रमाणात जिल्ह्यामध्ये कार्यवाही करण्यात येत असून 18 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा-जामखुर्द, ता.पोंभुर्णा हा रेतीघाट कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1, चंद्रपूर यांना शासकीय प्रकल्पाच्या बांधकामाकरिता राखीव ठेवण्यात आलेला आहे.
सार्वजनिक बांधाकाम विभाग क्र. 1 यांनी मे.एस.एस. ट्रान्सपोर्ट, प्रो.प्रा. जितेंद्र सुभाषराव येळणे, रा.चंद्रपूर यांच्यासोबत सदर रेतीघाटातील रेती उत्खनन करुन वाहतूक करण्याबाबतचा करारनामा केलेला आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या पथकाने दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी रात्री 8.53वाजता भेट दिली असता श्री. धनराज भाऊजी बुरांडे, रा.जामखुर्द, ता.पोंभुर्णा यांच्या मालकीची पोकलँड मशिन क्र. JS 205 SC द्वारे रेती उत्खनन करुन श्री. धनराज भाऊजी बुरांडे, रा.जामखुर्द, ता.पोंभुर्णा यांच्या मालकीची हायवा क्र. MH 34 BG 3833 भरत असल्याचे आढळून आले. तसेच श्री. महादेव सुतार, रा. चंद्रपूर यांच्या मालकीची रेती भरण्याच्या हेतूने आलेली हायवा क्र. MH 34 BG0347 खाली असल्याचे दिसून आले. सदर पोकलँड मशीन व हायवा जप्त करुन सिल करण्यात आले. व दंडात्मक कार्यवाही करण्याकरिता तहसिलदार, पोंभुर्णा यांना निर्देश देण्यात आले.
प्रकरणातील संबंधीत पोकलँड मशिन क्र. JS 205 SC चे मालक तसेच हायवा क्र. MH 34 BG 3833 चे मालक श्री. धनराज भाऊजी बुरांडे,रा.जामखुर्द, ता.पोंभुर्णा आणि हायवा क्र. MH 34 BG 0347 चे मालक श्री. महादेव सुतार, रा. चंद्रपूर तसेच कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग क्र. 1,चंद्रपूर यांना अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी नोटीस बजावण्यात आलेली आहे. पुढील कार्यवाही तहसिलदार, पोंभुर्णा यांचे मार्फत करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे मुल तालुक्यातील मौजा -बोरचांदली आणि मौजा - येरगांव हे रेतीघाट कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2, चंद्रपूर यांना शासकीय प्रकल्पांच्या बांधकामाकरिता राखीव करण्यात आलेले आहेत. सदर घाटांची सुध्दा सखोल चौकशी करण्यात येत असून त्यामध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधीताविरुध्द योग्य कार्यवाही करण्यात येईल.
जिल्ह्यात रेतीघाटातील अवैध उत्खनन व वाहतूकीवर उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांचे मार्फत नियंत्रण ठेवण्यात येते. वाळू/रेती निर्गती सुधारीत धोरण, 2018 नुसार अवैध उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधीत तहसिलदार, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा प्रतिनिधी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत तहसिलदार यांचा समावेश असलेली समिती गठीत केलेली आहे. तालुका स्तरावर तहसिलदार, उप अधिक्षक भूमी अभिलेख, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसिलदार (महसूल) यांचा समावेश असलेली समिती गठीत केलेली आहे. तसेच ग्राम पातळीवर ग्राम पंचायतीचे सरपंच, ग्राम सेवक, पोलीस पाटील,कोतवाल, तलाठी यांचा समावेश असलेली समिती गठीत केलेली आहे. सदर समित्यांमार्फत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यात येत असते. तसेच वाहनांद्वारे अवैध वाहतूक होऊ नये याकरिता प्रत्येक वाहनांवर G.P.S. यंत्रणा बसविण्यात आलेली असून वाहनासोबत बारकोडेड वाहतूक पासेस देण्याची कार्यप्रणाली अवलंबिण्यात येत आहे. अवैध उत्खनन व वाहतूक नियंत्रण करण्याच्या दृष्टीने अटी व शर्ती आदेश / करारनाम्यात समाविष्ठ असून रेतीघाट धारकास त्याचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.