चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राहुल पावडे यांची अविरोध निवड झाली असून झोन क्र. १ मधे बंटी उर्फ प्रशांत एकनाथ चौधरी, झोन क्र. २ मधे कल्पना बगूलकर, झोन क्र. ३ मधे सुरेश पचारे यांची झोन सभापतीपदी निवड झाली आहे. वर्तमान स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांची सभापतीपदी यंदा तिसरी टर्म असणार आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व झोन सभापती निवडणुकीसाठी अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी काम पाहीले. याप्रसंगी व्यासपीठावर मनपा आयुक्त संजय काकडे उपस्थित होते.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि झोन सभापतीपदी विद्यमान सभापतींचा १ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने १५ एप्रिल रोजी मनपा स्थायी समिती सभागृहात सदर पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे राहुल पावडे तर शहर विकास आघाडीचे दीपक जयस्वाल रिंगणात होते. यापैकी दीपक जयस्वाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत अर्ज मागे घेतल्याने राहुल पावडे यांची निवड बिनविरोध झाली.
झोन क्र. १ मधे बंटी उर्फ प्रशांत एकनाथ चौधरी, झोन क्र. २ मधे कल्पना बगूलकर यांचीही निवड अविरोध झाली मात्र झोन क्र. ३ सभापतीपदासाठी सुरेश पचारे व अली अहमद मंसूर यांच्यात लढत होती. हात उंचावून मतदान करण्याच्या प्रक्रियेत झोनच्या उपस्थित १७ सदस्यांपैकी सुरेश पचारे यांना ११ मते तर अली अहमद मंसूर यांना ६ मते मिळून सुरेश पचारे यांनी ५ मतांनी विजय प्राप्त केला.
याप्रसंगी सर्व स्थायी समिती सदस्य, उपायुक्त गजानन बोकडे, सहायक आयुक्त विजय देवळीकर, सचिन पाटील, शीतल वाकडे, मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी, नगरसचिव सुभाष ठोंबरे, शहर अभियंता महेश बारई तसेच महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.